कणकवली शहरात सलग तिसऱ्या वर्षी पहाटे ४ वाजता रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर भरले पाणी
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. १६ मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार दिलीप बिल्डकॉन यांनी केलेल्या रस्त्यांच्या कामांचा कणवलीकरांना त्रास सहन करावा लागला आहे. कणकवली शहरात सलग तिसऱ्या वर्षी पहाटे ४ वाजता रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पाणी भरले. गेले तीन – चार दिवस कोसळणार्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आले होते. मात्र गोकुळधाम हॉटेलच्या बाजुला पाणी विसर्ग होत असलेल्या तोंडावर महामार्ग ठेकेदारांने सेंट्रींग साहित्य न काढल्यामुळे पुन्हा एकदा पाणी तुंबले. महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी केलेला दुर्लक्ष आहे. त्यामुळे पाणी थेट रामेश्वर प्लाझा इमारतीमध्ये घुसल्याने वाहने पाण्यात अडकली होती. पहाटे चार वाजल्यापासुन रहिवाश्यांनी जीव मुठीत धरुन आपली वाहने पार्किंगमधुन बाहेर काढली. मात्र याठिकाणी आपत्कालीन विभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याठिकाणी कोणीच आले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कणकवली महामार्ग उड्डाणपुलाचे काम आटोपल्यानंतर कणकवली शहरातील गटारे व नाले विसर्ग चांगल्या पद्धतीने करण्याची गरज होती. मात्र ठेकेदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने काम संपल्याने पोबारा केला आहे. त्याचा फटका याठिकाणी पहिल्याच पावसात या भागातील नागरिकांना बसला आहे.
त्याचबरोबर अन्यही कणकवली शहरातील नाले – गटारे अर्धवट टाकुन या दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला आहे. अनेकदा सत्ताधारी व विरोधकांनी आवाज उठवुनदेखील, त्याकडे दुर्लक्ष करत हा कंपनीचा ठेकेदार प्रसार झाला आहे.
यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी व विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठविण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात संपुर्ण कणकवलीत पाणी भरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पहाटे पाणी भरले त्यावेळेस रामेश्वरला प्लाझा रहिवासी डॉ. अशोक कदम, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नीलम पवार, संजय राणे, वकील पी. एन. कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार माधव कदम, शिवाजी कासले, सुनील कदम, अमित दळवी आदींनी आपली वाहने बाहेर काढली. आपत्कालीन विभागाला संपर्क साधला, मात्र पाणी ओसरले तरी कोणीही आले नव्हते.

