वारंवार सुचना देऊनही अत्यावश्यक सेवेत न मोडणारे दुकानदार ऐकत नसतील, तर अशा दुकानांना कोरोना संपेपर्यंत टाळे ठोकणार – अवधुत तावडे

🎥कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २९ कोव्हीड काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केवळ अत्यावश्यक दुकानेच सकाळी ७ ते ११ या वेळेत उघडण्यास मुभा असतानाही, नियमभंग करून अन्य दुकानेही सुरू ठेवण्याचे प्रकार कणकवली शहरात घडत आहेत. वारंवार सुचना देऊनही अत्यावश्यक सेवेत न मोडणारे दुकानदार ऐकत नसतील तर, अशा दुकानांना कोरोना संपेपर्यंत टाळे ठोकणार असल्याचा इशारा कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी दिला आहे.

कणकवली शहराचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट सर्वाधिक आहे. अगदी २८ मे रोजी पटवर्धन चौकात रॅपिड टेस्ट मध्ये १६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या पार्श्वभुमीवर प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

२८ मे रोजी महसुल, पोलीस आणि नगरपंचायतच्या पथकाने संयुक्त कारवाई करत, अत्यावश्यक नसलेली दुकाने उघडणाऱ्या ३ व्यापाऱ्यांवर ३० हजारांची दंडात्मक कारवाई केली होती, तर दोघांवर गुन्हे दाखल केले. त्याचा परिणाम होऊन आज २९ मे रोजी बाजारपेठेतील गर्दी कमी झालेली दिसली.

नगरपंचायत मुख्याधिकारी अवधुत तावडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे पटवर्धन चौकात ठाण मांडुन होते. पटवर्धन चौकात आजही अनावश्यक फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट केली जात आहे.

कणकवली बाजारपेठेत अत्यावश्यक नसलेली काही दुकानेही आज सुरू होती. मात्र मुख्याधिकारी तावडे आणि एपीआय खंडागळे यांनी बाजारपेठेच्या दिशेने कुच करताच सकाळी १०.३० वाजता दुकानदारांनी आपली शटर डाऊन करत संभाव्य दंडात्मक कारवाई टाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!