कुडाळ नगरपंचायत कार्यालयाकडून धडक कार्यवाही.
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर*
*🎴कुडाळ, दि-१९ :-* कुडाळ नगरपंचायत क्षेत्रातील केळबाईवाडी- तुपटवाडी येथे जाणाऱ्या रस्त्याचे पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी गटार बांधण्याचे काम कुडाळ नगरपंचायत कार्यालयाकडून प्रस्तावित करण्यात आलेले होते. सदर कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली होती व 90% पेक्षा जास्त काम पूर्ण करण्यात आले. तथापि, या गटारावर बांधकाम करण्यास अडथळा ठरणारे शेवग्याचे झाड निष्कासित करण्यास संबंधित जागा मालक श्री. आप्पाजी गोपाळ राऊळ, रा. केळबाईवाडी यांना नगरपंचायतीकडून वारंवार कळविण्यात आले. तरीही श्री. आप्पाजी गोपाळ राऊळ यांनी विरोध केल्याने गटाराचे काम 3-4 महिने थांबविण्यात आले होते.
सदरचे शेवग्याचे झाड काढून टाकण्याबाबत जागा मालक श्री. आप्पाजी गोपाळ राऊळ यांना नगरपंचायतीकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. अडथळा ठरणारे शेवग्याचे झाड न हटवल्याने व विकास काम थांबवल्याने या भागाचे लोकप्रतिनिधी श्री. गणेश भोगटे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचे निवेदन दिले होते. त्यावेळी नगरपंचायतीने सदरचे झाड हटवून विकास काम पूर्ण करण्याची कार्यवाही करण्याच्या अटीवर श्री. गणेश भोगटे यांनी आपले उपोषण केले नाही.
नोटिसा देऊन, तसेच अनेक वेळा चर्चेतून सदर झाड हटविण्यास तयार नसल्याने नगरपंचायतीने श्री. आप्पाजी गोपाळ राऊळ यांना अंतिम नोटीस देऊन दि.18/05/2021 पर्यंत झाड हटविण्याचे आदेश दिले होते. तरीही संबंधित जागा मालकाने सदरचे झाड न हटविल्याने नगरपंचायतीने दि.19/05/2021 रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून रितसर शुल्क भरणा करुन 9 पोलिस अधिकारी मंजूर करुन घेतले. दरम्यानच्या कालावधीमध्ये श्री. आप्पाजी गोपाळ राऊळ यांनी बांधकाम झालेल्या गटारावर चिरे लावून अतिक्रमण केलेले होते. सदर अतिक्रमण काढणेबाबतही नगरपंचायतीने सूचना केलेल्या होत्या. शेवग्याचे झाड तोडतेवेळी नगरपंचायत अभियंता व श्री. राऊळ यांचेमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. श्री. राऊळ यांनी सदर काम अडविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु नगरपंचायतीने त्यांच्या प्रयत्नाला खतपाणी न देता पूर्ण झाड व गडग्याचे अतिक्रमण काढले. सदर कार्यवाही 9 पोलीस संरक्षणासह श्री. विशाल होडावडेकर, नगर अभियंता (पथक प्रमुख) यांचे नेतृत्वाखाली श्री. प्रसाद नाईक, श्री. संकेत गावडे, श्री. राजाराम कुंभार, शिपाई व सफाई कामगार पथकाने सदरचे झाड निष्कासन करण्याची कार्यवाही केली. सदरचे झाडाचा अडथळा दूर झाल्याने गटार बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील इतर अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामावर अशा प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचे नगर अभियंता श्री. विशाल होडावडेकर यांनी सूचित केले आहे.