आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾तिलारी कालव्याचा कारभार ठेकेदारांकडून मिळणार्‍या टक्केवारीसाठी..

 

◾रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांचा आरोप..

◾२५ मे पर्यंत कालव्याला पाणी न आल्यास प्रखर आंदोलन..

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

 ✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-१२ :- तिलारी कालव्याचे काम सुरु होऊन चाळीस वर्षांचा कालावधी लोटला तरीही प्रकल्पबाधित गावांना पाणी मिळणे दिवास्वप्नच राहिले आहे. कालव्याचे काम कासवगतीने सुरु असून हा प्रकल्प केवळ कागदावरच आहे. संबंधित विभागाचे अधिकारी केवळ आश्वासने देऊन वेळ मारुन नेण्याचे काम करतात. कालव्याचा कारभार पाहता केवळ ठेकेदारांकडून मिळणार्‍या टक्केवारीसाठी चालला असल्याचा गंभीर आरोप रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. २५ मे पर्यंत कालव्यातून रोणापाल गावापर्यंत पाणी न आल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणतात, मुबलक पाणी मिळण्याच्या आशेने प्रकल्पबाधित गावातील शेतकर्‍यांनी कवडीमोल दराने आपल्या जमिनी कालवा प्रकल्पासाठी दिल्या. रोणापाल, निगुडे, मडूरा, शेर्ला, कास, सातोसे या गावांचा समावेश तिलारी हरित पट्ट्यात करण्यात आला. त्यामुळे कोणत्याही पद्घतीने जमीन हस्तांतरण करणे, कर्ज काढणे, लागवड करणे, सहकारी संस्थांकडे काम असल्यास तसेच बिनशेती करायची असल्यास आणि अशा प्रकारच्या अनेक कामांसाठी तिलारी कार्यालयाचा ना हरकत दाखला अनिवार्य झाला.

भविष्यात पाणी मिळण्याच्या आशेने शेतकर्‍यांनी सर्व सहन केले. मात्र, कालव्याच्या कामाची गुणवत्ता आणि गती पाहता पाणी मिळणे दुरापास्तच आहे. चार महिन्यांपूर्वी चराठे येथील तिलारी कार्यालयात माझ्यासह प्रकाश वालावलकर, अरुण पंडीत, निगुडे सरपंच समीर गावडे, इन्सुली माजी ग्रा. पं. सदस्य महेश धुरी, रविंद्र म्हापसेकर यांनी अधिकार्‍यांची भेट घेऊन विचारणा केली. त्यावेळी १५ मे पर्यंत रोणापाल गावापर्यंत पाणी येईल असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्यापपर्यंत इन्सुली गावापर्यंत कालव्याचे पाणी आलेले नाही.

तिलारी कालव्याचा कारभार पाहता ही योजना तिलारी विभागातील कर्मचार्‍यांसाठी, ठेकेदारांसाठी की जमीन दिलेल्या शेतकर्‍यांसाठी आहे असा प्रश्न उभा राहतो. ठेकेदारांकडून मिळणार्‍या टक्केवारीसाठी तीन दशके हा कारभार सुरु असल्याचा गंभीर आरोप सुरेश गावडे यांनी केला आहे. मुख्य कालव्याला पाणी नसतानाही पोटकालव्यांच्या कामाचा अट्टहास का ? असा सवालही त्यांनी केला आहे. २५ मे पर्यंत रोणापाल गावापर्यंत पाणी न आल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!