आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

◾वहाळ आरोग्य केंद्रातील डॉक्टर,कर्मचाऱ्यांचा बोगस कारभार उघड..

 

◾स्थानिकांनी मांडल्या तक्रारी ;आ. भास्करराव जाधव संतापले

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण, दि-११ :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील वहाळ (ता. चिपळूण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट, लसीकरणाची माहिती व अडचणी समजून घेण्यासाठी गेलेले आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्यासमोरच तेथील डॉक्टर,  कर्मचाऱ्यांचा बोगस कारभार उघड झाला. त्यामुळे सुरूवातीला स्थानिक ग्रामस्थांना शांत करून ही वेळ वादावादीची नाही, डॉक्टरांना मदत करण्याची आहे, असे आवाहन करणाऱ्या आ. श्री. जाधव यांचा पारा चढला. ते प्रचंड संतापले आणि आपल्या शैलीत दोन शब्द सुनावताच यापुढे असं होणार नाही, अशी कबुली डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार श्री. जाधव हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सापडणाऱ्या  मतदारसंघातील जनतेचे प्राण वाचविण्यासाठी झोकून देवून काम करीत आहेत. ज्यांना बेड मिळत नाहीत त्यांना बेडची, आॅक्सिजनची तसेच रेमडेसिवीरसारखी लस उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत. मतदारसंघात ठिकठिकाणी नव्याने कोविड केअर सेंटर उभी करून त्या त्या भागातील रूग्णांची व्यवस्था करीत आहेत. तिथे रूग्ण आढळत आहेत अशा ठिकाणी स्वखर्चाने औषधे पुरवित आहेत. स्वतःच्या कुटुंबाला कोरोनाचा फटका बसूनही ते दुःख बाजूला ठेवून शांत न बसता त्यांनी मदतकार्य सुरू ठेवले आहे. आताची लाट ही घातक असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यासाठी ते मतदारसंघात सगळीकडे सतत फिरत आहेत.

आज ते वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तिथल्या समस्या जाणून घेण्यासाठी गेले होते. या ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरणाची माहिती घेत असताना लस उपलब्ध झाल्याचे मेसेज रूग्णालयाचा सुपरवायजर त्यांच्या गावागावातील आरोग्य कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक  उशिरा पाठवतो. त्यामुळे पुढे हे मेसेज लोकांपर्यंत वेळेत पोहोचत नाहीत. परिणामी कर्मचाऱ्यांच्या अवतीभवती असलेले लोकंच लसीकरण करतात,  अशा तक्रारी स्थानिक लोकांकडून समोर आल्या. परंतु, ही वेळ वादावादीची नाही, डॉक्टरांना मदत करण्याची आहे, असे सांगून डॉक्टरांचे मनोधैर्य वाढविण्याची, त्यांना मदत होईल अशी भूमिका घेवून ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न आ. श्री. जाधव करीत होते. परंतु, ग्रामस्थांकडून वारंवार हा मुद्दा पुढे आल्यानंतर त्यांनाही थोडी शंका आली. त्यांनी सुपरवायजरला विचारले असता मेसेज वेळेत पाठविल्याचे त्याने सांगितले. परंतु, ज्यावेळी त्याच्या मोबाईलवरून पाठवला गेलेला मेसेज पाहिला तेव्हा त्याने केलेली लबाडी समोर आली. त्याने मेसेज सायंकाळी केला होता आणि सकाळी केल्याचे तो सांगत होता, हे पाहून आ. जाधव संतापले आणि त्यांनी सुपरवायजरसह डॉक्टरांनाही चार शब्द सुनावले. संकटाचा काळ असताना असं बेजबाबदार वागताना तुम्हाला काहीच वाटत नाही? असा सवाल त्यांनी केला.

या आरोग्य केंद्रासाठी एमबीबीएस डॉक्टर म्हणून फुरूस आरोग्य केंद्राचे डॉ. विजय पाटील यांच्याकडे अतिरिक्त भार आहे. पण ते कधीही येथे नाहीत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. यावर डॉ. पाटील आठवडयातून किती दिवस येतात, असा प्रश्न आ. श्री. जाधव यांनी उपस्थित डॉ. दीपाली पांडे व डॉ. मंदार आमले या बीएएमएस डॉक्टरांना विचारला. मात्र, त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतः मोबाईलद्वारे त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन बंद होता. डॉ. पाटील हे सरकारी रूग्णालयात कमी आणि स्वतः चालवित असलेल्या खासगी दवाखान्यातच जास्त असतात,  अशीही तक्रार  काही  ग्रामस्थांनी केली. यावर आपण याची नोंद घेत आहोत, असे सूचक उद्गार आ. जाधव यांनी काढले.

आ. श्री. जाधव हे आरोग्य केंद्रात पोहोचले तेव्हा लसीकरणासाठी मोठी गर्दी झालेली त्यांनी पाहिली. लस घेण्यासाठी वेगवेगळ्या भागातून आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला तेव्हा लसीकरण उशिराने सुरू करण्यात आल्याची आणि संथ गतीने सुरू असल्याची तक्रार अनेकांनी केली. यानंतर हे काम कशा प्रकारे सुरू आहे, याची माहिती घेऊन ते गतीने कसे होऊ शकेल यावर मार्ग काढला. त्यानंतर लसीकरणाला गती आली.

आरोग्य केंद्राला जे जे आवश्यक आहे ते देण्याची जबाबदारी माझी आहे. परंतु, सामान्य जनतेची कुठलीही गैरसोय होता कामा नये. या संकटकाळात कोणताही प्रश्न, समस्या, अडचण असेल तर थेट माझ्याशी बोला, असे सांगून आ. श्री. जाधव यांनी स्वतःचा मोबाईल नंबर डॉक्टरांना दिला.

यावेळी पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. या सर्वांनी आ. श्री. जाधव यांचे आभार मानले. यावेळी माजी उपसभापती श्री. शरद शिगवण, श्री. रवींद्र सुर्वे, श्री. रमेश रेपाळ, निवळीचे उपसरपंच गणेश विचारे आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!