आणखीआरोग्यकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾डॉ. आसावरी धुरी कोरोना रुग्णांच्या सेवेत रुजू

 

◾बऱ्यापैकी चाललेली प्रँक्टिस बंद करून घेतला कोविड रुग्णांच्या सेवेचा निर्णय

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शंकर जाधव

🎴दोडामार्ग, दि-१० :- साटेली भेडशी येथील डॉ. आसावरी प्रभाकर धुरी कोरोना रुग्णांच्या सेवेत रविवारपासून (ता.९)रुजू झाल्या आहेत.दोडामार्ग येथील आयटीआयमध्ये जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये ‘आयुष वैद्यकीय अधिकारी’ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांच्या सुविधेसाठी जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच जिल्ह्यात काही ठिकाणी तात्पुरती कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. या सेंटरमध्ये रुग्णसेवेसाठी तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी प्रशासनाने जाहिरात दिली होती. तथापि या जाहिरातीला अत्यल्प प्रतिसाद मिळून फक्त एक अर्ज प्राप्त झाल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले. ते वाचून त्यांनी आपली सेवा कोविड केअर सेंटरसाठी देण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी अर्ज केला. त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडल्यावर त्यांची नियुक्ती दोडामार्ग येथे तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली व त्या रविवारपासून दोडामार्ग कोविड केअर सेंटरमध्ये रुजू झाल्या.त्या मळगाव येथे क्लिनिक चालवत होत्या. तेथे त्या रुग्णांना चांगली सेवा द्यायच्या;पण सामाजिक बांधिलकीच्या हेतूने कोविड बाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी त्यांनी कोविड केअर सेंटरला रुजू व्ह्यायचा निर्णय घेतला. साटेली भेडशी केंद्रशाळेच्या मुख्याध्यापक पूनम पालव-धुरी आणि पत्रकार प्रभाकर धुरी यांच्या त्या कन्या.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. त्या संकटावर मात करण्यासाठी सरकार आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.कोरोना रुग्णांना बरे करण्याच्या, त्यांना वाचवण्याच्या कार्यात आपलाही सहभाग असावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण हा निर्णय घेतला असल्याचे डॉ. आसावरी धुरी म्हणाल्या.कोरोना प्रसार रोखण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घरीच थांबणे, मास्क वापरणे, वारंवार हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर पाळणे या गोष्टींचा अवलंब करावा आणि लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आपल्याला रुग्णसेवेची संधी दिल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर ,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आदींचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!