कणकवली बाजारपेठ पुर्णपणे बंद, नागरिक आणि व्यापारी यांचा चांगला प्रतिसाद
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०१ शहरात १ मे ते १० मे या कालावधीत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन नगरपंचायत, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटना यांच्यातर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिक, व्यापारी, तसेच विविध आस्थापनांनी आज कर्फ्युच्या पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद देत, हा जनता कर्फ्यु १००% यशस्वी केला.
जनता कर्फ्युच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात बँका, शासकीय कार्यालये, औषधालये, रुग्णालयातील कर्मचारी वगळता कोणीही व्यक्ती रस्त्यावर फिरलेली दिसत नव्हती. सर्वच आस्थापना कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे चौका – चौकातील रस्त्यावर निरव शांतता पाहायला मिळाली.
नगरपंचायतकडुन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष दालनात बैठक पार पडली होती. या बैठकीत स्थानिक व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात व्यापारी आस्थापना विषयी सविस्तर चर्चा करून १० दिवसांच्या जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला.
शनिवारी पहिल्या दिवशी या निर्णयाचे शहरवासीयांनी स्वयंपुर्तीने तंतोतंत पालन करत घरी राहणे पसंत केल्याने, या आव्हानाला १००% प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. यामुळे १० दिवस अशाच प्रकारे सहकार्य करण्याचे आवाहन, संबंधित प्रशासनाकडुन करण्यात येत आहे.
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढु नये आणि संसर्ग साखळी खंडित व्हावी म्हणुन या जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यापुढील दिवशी या जनता कर्फ्युला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

