◾कुंभार्ली घाट चेकपोस्टवर वाहन चालकांची तपासणी करा ; जयंद्रथ खताते यांची पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याकडे मागणी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-१० :- दोन दिवसांपूर्वी चिपळूण – कराड राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाटात दोन मोठ्या वाहनांमध्ये अपघात झाला . अपघातातील ट्रक थोडक्यात खोल दरीत कोसळताना वाचला . या वेळी वाहन चालवणारे चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले . मद्यपान करून गाडी चालवण्यामुळे अपघाताच्या घटना वाढत आहेत . त्यामुळे शिरगाव पोलीस नाका आणि कुंभार्ली घाटातील चेकपोस्ट येथे वाहनधारकांची तपासणी करावी , अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे . चिपळूण – कराड तसेच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची कायम वर्दळ असते . दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करीत असतात . वाहन ‘ चालवताना मद्यपान करणे हा कायद्याने गुन्हा आहे . चिपळूण – कराड मार्गावर गेल्या काही महिन्यात वारंवार अपघात झालेले आहे . त्यातच या मार्गावरील कुंभार्ली घाट हा वाहतुकीसाठी धोकादायक आहे . मद्यपान करून वाहन चालवताना दुसऱ्या वाहनांना अधिक धोका संभवतो . शिरगाव येथे पोलीस स्थानक आहे . शिवाय कुंभार्ली घाटात पोलीस चेकपोस्ट आहे . या दोन्ही ठिकाणी वाहन चालकांची तपासणी केल्यास मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना चाप बसण्यास मदत होईल . परिणामी काही प्रमाणात अपघात कमी होतील . यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन मद्यधुंद वाहन धारकांवर कारवाई करावी , अशी मागणी श्री.खताते यांनी पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याकडे केली आहे . .

