एस. टी.च्या फे-या पुन्हा सुरू करण्याची मागणी…
🖥️ Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी : दि. ०१ मानवविकास अंतर्गत सुरू असलेली एस. टी. बस बंद झाल्याने कुसुर येथील विद्यार्थ्यांनी उपसभापती अरविंद रावराणे यांची भेट घेतली. एसटीच्या फे-या पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. उपसभापती यांनी विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेऊन या संदर्भात तात्काळ कणकवली आगार प्रमुख व विभागीय नियंत्रक यांना पत्र दिले आहे.
वैभववाडी तालुक्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थीनीसाठी एस. टी. सेवा शासनाकडून सुरू आहे. मात्र कोरोनाच्या लाँकडाऊन पासून या एसटीच्या फे-या बंद करण्यात आल्या आहेत. कुसुर गावातून जाणाऱ्या सकाळी १० वा वैभववाडी – गवळवाडी व वैभववाडी – जांभवडे या एस. टी.च्या फे-या बंद करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना भर उन्हातून तीन किमीचा पायी प्रवास करावा लागतो. यासंदर्भात आज विद्यार्थ्यांनी उपसभापती अरविंद रावराणे यांची भेट घेतली. तसेच ही बसफेरी सुरू करण्याची मागणी केली.
विद्यार्थ्यांच्या या मागणीची रावराणे यांनी दखल घेऊन कणकवली आगार प्रमुखांना पत्र दिले आहे. लवकरच एसटी फेरी सुरू होईल अस आश्वासन रावराणे यांनी विद्यार्थ्यांना दिले. यावेळी वैष्णवी पाटील, सृष्टी साळुंखे, तेजस्वी साळुंखे, स्वाती साळुंखे, शिवानी पवार, वृषाली पाटील यासह विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

