डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयात ‘भरारी’ वार्षिकांकाचे प्रकाशन
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण : दि. ०१ येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात नुकतेच ‘भरारी’ वार्षिक अंकाचे प्रकाशन लेखक, पर्यटन व पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. वर्तमान कोरोना काळातील सर्व शासकीय नियमावली पाळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष जयसिंग मोरे, प्राचार्य डॉ. विजयकुमार खोत, संचालक कृष्णकांत चव्हाण, संदीप गोखले, डॉ. शांतीलाल रावळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना धीरज वाटेकर यांनी कोरोना परिस्थितीतही महाविद्यालयाने आपली वार्षिकांकाची परंपरा सुरू ठेवून विद्यार्थ्यांच्या साहित्य, सृजनशीलता आणि कलागुणांना महाविद्यालय स्तरावर वाव दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाने कोरोना काळात राबविलेले उपक्रम निळ्याशार आकाशात भरारी घेण्याची ताकद देत आहेत. अन्नदाता शेतकरी ते अर्थकारणापासून समाजकारणपर्यंत कोरोना काळातील विविध माहिती असलेला हा अंक ग्रामीण भागातील उत्तम संदर्भ डॉक्युमेंटेशन झाला असल्याचे वाटेकर म्हणाले. लेख लिहिणं फारसं अवघड नाही. मात्र अनुभवाचं संचित वाचकांच्या मनाला भिडणाऱ्या शब्दांच्या माध्यमातून कागदावर उतरवणं अवघड आहे, यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम करायला हवेत. नुसतं छापलेलं वाचण म्हणजेही वाचन नव्हे ! पूर्वी माणूस निसर्ग वाचायचा, आजही वाचतो. आपण हे समजून घ्यायला हवे आहे. मानवी जगणं समृद्ध होण्यासाठी वाचन करणं गरजेचं आहे. शेवटी, महाविद्यालयाचा अंक सोशल मिडीयावर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध व्हावा, तसेच विद्यार्थ्यांनी एखादं महाविद्यालयीन गीत लिहिता येईल का ? यासाठी जरूर प्रयत्न करावेत, अशी सूचना वाटेकर त्यांनी मांडली.
अंकाच्या संपादक प्रा. राजश्री कदम यांनी आपले अनुभव सांगितले. कोरोना काळात विविध लेखन लिहिणे लिहून घेणे आणि प्रकाशित करणे आव्हानात्मक होते. मात्र सर्वांनी मिळून केल्याने ते शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष जयसिंगराव मोरे यांनी, लिखाणाचे महत्त्व विशद केले. आपल्या मनातील भावना लिहून ठेवल्यानंतर कालांतराने वाचन केल्यास सुखद अनुभव घेता येतात असे मोरे यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य विजयकुमार खोत, कृष्णकांत चव्हाण यांनीही आपले विचार मांडले. प्रकाशन कार्यक्रमाला प्रा. विकास मेहेंदळे, नॅक समन्वयक डॉ. एस. डी. सुतार, समन्वयक डॉ. एन. बी. डोंगरे, डॉ. संगीता काटकर, डॉ. सत्येंद्र राजे आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

