आरोंदा येथे विद्युत वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे घराचे नुकसान
आरोंदा-बांधवाडी येथील सुनील गोविंद तिरोडकर यांच्या घराला विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये स्पार्किंग होऊन आग लागल्याची घटना घडली. या घटनेत घरातील कपडे, नारळ, जीवनावश्यक वस्तू, घराचे वासे, लाकूड सामान,दोन खोल्यांचे छप्पर तसेच घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीचा काही भाग जळून नुकसान झाले. मात्र, ग्रामस्थांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या पंपाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
सुनील तिरोडकर यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्यांचे जुने मातीचे घर आहे. ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यावर संकट ओढवले आहे.
घटनेची माहिती मिळताच आरोंदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. तसेच विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
आरोंदा परिसरातील जुने विद्युत खांब आणि जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी व ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. त्यामुळे विद्युत विभागाने जुन्या विद्युत खांबांची व वाहिन्यांची तातडीने तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित यंत्रणेने पाठपुरावा करावा आणि नुकसानग्रस्त सुनील तिरोडकर यांना योग्य आर्थिक नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.ही घटना शनिवारी ३ ऑक्टोबर सायंकाळी चार च्या सुमारास घडली.याबाबत पोलिस पाटील जितेंद्र जाधव यांनी माहिती दिली.

