सावंतवाडी काँग्रेसकडून गांधी-शास्त्री जयंती उत्साहात; तवकीर शेख यांची जिल्हा अल्पसंख्याक सेल अध्यक्षपदी नियुक्ती
जीवन रक्षा कार्यालयात विचारांना उजाळा; नवनियुक्त अध्यक्ष तवकीर शेख यांचा सत्कार, पक्षकार्य जोमाने करण्याचे आवाहन
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने उभा बाजार येथील जीवन रक्षा कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या अहिंसेच्या विचारांना तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा आणि उच्च विचारसरणीला अभिवादन केले.
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांची ओळख नवीन पिढीला करून देण्याची गरज असल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले. समाजात शांतता, बंधुभाव, साधेपणा आणि राष्ट्रनिष्ठेचे मूल्य रुजविण्यासाठी या महापुरुषांचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी नगरसेवक तवकीर शेख यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रदेश प्रतिनिधी अॅड. दिलीप नार्वेकर आणि जिल्हा सरचिटणीस रवींद्र मापसेकर यांच्या हस्ते तवकीर शेख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
नवनियुक्त अध्यक्ष तवकीर शेख यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. अल्पसंख्याक समाजासह सर्व घटकांपर्यंत काँग्रेसचे विचार आणि पक्षाचे कार्य पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, प्रदेश प्रतिनिधी अॅड. दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र मापसेकर, माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, अॅड. राघवेंद्र नार्वेकर, विनायक ओटवणेकर, अमिदी मेस्त्री, सुमेधा सावंत, आनंद आयरे, कौस्तुभ पेडणेकर, सुधीर मल्हार, बाळा नमशी, प्रदीप चौगुले, आफताब हेरेकर, सुभाष नाईक, नगरसेवक तवकीर शेख, अन्वर खान सर, पीटर फर्नांडिस, विनायक सावंत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

