Uncategorized

हत्तींच्या हैदोसाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! पाळये येथे बेमुदत उपोषण

दोडामार्ग : हत्तींसह इतर वन्यप्राण्यांकडून शेती-बागायतीचे वारंवार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, या मागणीसाठी पाळये दशक्रोशीतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आज महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत शुक्रवार, २ ऑक्टोबरपासून पाळये येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा तसेच शेती-बागायतीच्या संरक्षणासाठी ठोस व प्रभावी उपाययोजना कराव्यात, या प्रमुख मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा प्रश्न कायम असून, वारंवार निवेदने, आंदोलने आणि मागण्या करूनही ठोस तोडगा निघालेला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हत्तींच्या उपद्रवामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती-बागायती उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावेळी बोलताना गणपत दळवी यांनी सांगितले की, “हत्तींच्या उपद्रवामुळे संपूर्ण शेती संपुष्टात आली आहे. केवळ नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांचे पुढील भवितव्य सुरक्षित होणार नाही. कर्नाटकातून आलेल्या हत्तींना ज्या ठिकाणाहून ते आले, त्या ठिकाणी परत पाठविण्यासाठी शासनाने ठोस उपाय करणे गरजेचे होते; मात्र त्यामध्ये शासन कुचकामी ठरले आहे.”

“आज हा प्रश्न शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा झाला आहे. मोर्ल्या सारख्या गावात हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकऱ्याला प्राण गमवावा लागला. त्याला नुकसानभरपाई दिल्याने त्याचा गेलेला जीव परत येणार आहे का? लोकशाहीमध्ये जगण्याचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. तोच हिरावून घेतला जात असेल तर त्या लोकशाहीला अर्थ काय?” असा सवालही दळवी यांनी उपस्थित केला.

महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात असहकार चळवळ आणि शांततेच्या मार्गाचा अवलंब केला. त्याच अहिंसक मार्गाने पाळये दशक्रोशीतील शेतकरी एकत्र आले असून, शासनाने शेतकऱ्यांचा जगण्याचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी हत्ती व इतर वन्यप्राण्यांचा योग्य बंदोबस्त करावा, तसेच वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेती-बागायतीच्या नुकसानीवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, या बेमुदत उपोषणाला दोडामार्ग तालुका विकास मंडळ, मुंबई, फळबागायतदार शेतकरी संघटना दोडामार्ग, सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघटना, सिंधुदुर्ग नर्सरी धारक संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी पदवीधर संघ, राजा शिवाजी महाराज शेतकरी संघटना वेंगुर्ला, सावंतवाडी-दोडामार्ग शेतकरी लाकूड व्यावसायिक संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा उत्पादक संघटना, सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती, वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय संघटना, तालुका शेतकरी संघटना यांसह विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार पाळये ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!