सिंधुदुर्ग प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर; सेवाभावी उपक्रमांना सहकार्याचे निर्देश!
वरिष्ठांकडून थेट सूचना; पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद — विशाल परब यांच्या सेवाभावी उपक्रमांची प्रशासनाकडून दखल
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सेवाभावी उपक्रमांना प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी भाजप युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेल्या पत्रव्यवहारातून विविध सेवाभावी उपक्रमांना प्रशासनाने सहकार्य करण्याच्या सूचना दिल्याचे या कागदपत्रांवरून दिसून येते.
रविंद्र चव्हाण यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना पाठवलेल्या पत्रात विशाल परब यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करून, त्यांच्या सेवाभावी उपक्रमांना प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळावे, अशी विनंती केली आहे. विशेषतः पिण्याचे पाणी, वृक्षारोपण, शेतकऱ्यांसाठी पाण्याची उपलब्धता, पावसाचे पाणी अडवणे व इतर लोकाभिमुख उपक्रम यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रातही जिल्ह्यातील सेवाभावी उपक्रमांना प्रशासनाने सहकार्य करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सेवाभावी कामांसाठी प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘पत्रांपुरते नाही, प्रत्यक्ष कृतीत दिसणार का?’
मात्र आता खरा प्रश्न हा आहे की, कागदावरील सूचना प्रत्यक्ष गावागावातील कामांपर्यंत किती वेगाने पोहोचतात? पाणी, पर्यावरण, शेती आणि लोकहिताच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना केवळ आश्वासने नकोत, तर आवश्यक शासकीय परवानग्या, विभागीय समन्वय आणि प्रत्यक्ष मदत मिळणे गरजेचे आहे.
वरिष्ठ पातळीवरून सूचना झाल्यानंतर आता स्थानिक प्रशासन किती वेगाने ‘अॅक्शन मोड’मध्ये येते, याकडे सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागले आहे.

