मांगवली येथे सात्विक गोमेय गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी : दि. २७ अध्यात्मिक दृष्ट्या समाजात गाईला खूप मानले जाते. गोमेय वस्ते लक्ष्मी या उक्तीप्रमाणे घरात रोज नित्यनियमाने गाईची पूजा केल्यास मनशांती लाभेल. त्याचबरोबर देशी स्थानिक गाय वाचेल. गो आधारित शेतीवर प्रत्येकाने भर द्या. आपोआप रोजगाराची संधी उपलब्ध होईल. चांगल्या आरोग्यसह समृद्धी लाभेल असे प्रतिपादन सुवर्णसिंधू गिर गोशाळेचे चेअरमन महेश संसारे यांनी व्यक्त केले.
मांगवली येथे सात्विक गोमेय गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली. प्रवण शेतकरी उत्पादक कंपनी वैभववाडी व लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने मोफत ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला तालुक्यातील 30 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी लुपिनचे जिल्हा प्रकल्प अधिकारी योगेश प्रभू, संतोष कुडतरकर, प्रशिक्षक श्री. माळगावकर, प्रवणचे संचालक सचिन म्हापुसकर, मंगेश कदम, सुहास सावंत, प्रविण पेडणेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
संसारे म्हणाले, यंदाच्या गणेश चतुर्थीपूर्वी दहा हजार गणेश मुर्त्या तयार करण्याचा कंपनीचा संकल्प आहे. त्यासाठी 100 व्यावसायिक जिल्ह्यात उभे करणार आहोत. बनविण्यात आलेल्या मुर्त्या या पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात विक्री करण्यात येतील, अशी व्यवस्था प्रवण मार्फत केली जाईल असे सांगितले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

