सावंतवाडी शहरात स्टॉल हटाव मोहिम, नागरिक संतप्त…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴 सावंतवाडी : दि. २६ शहरातील विठ्ठल मंदिरशेजारील एका स्टॉलवर कारवाई करण्यासाठी आज सायंकाळी पालिकेचे कर्मचारी फौजफाटा घेऊन दाखल झाले होते. यावेळी हा स्टॉल गेली ४० वर्षे याठिकाणी असून आमचा रोजगार यावर अवलंबून आहे. असे स्टॉल मालकाने कारवाईसाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना सांगितले. तर हा स्टॉल खासगी जागेत असताना पालिकेचे अधिकारी कारवाईसाठी कसे आले ? असा सवाल तेथे जमलेल्या संतप्त नागरिकांनी केला आहे.
यावेळी काही झाले तरी हा स्टॉल हटवायला देणार नाही, असा इशारा शहरवासीयांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. यावेळी संतप्त आणि आक्रमक झालेले शहरातील नागरिक पाहता पालिकेचे पथक माघारी फिरत असताना, जोपर्यंत मुख्याधिकारी घटनास्थळी येऊन याबाबत माहिती देत नाही, तोपर्यंत कोणालाही जायला देणार नाही. अशी भूमिका घेत ट्रॅक्टर खाली झोपण्याचा इशारा दिला. सावंतवाडीकर संतप्त झाल्यानं पालिका प्रशासन आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकारामुळे शहरवासीयांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे.

