आणखीकुडाळकोकणराजकीयसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आस्थापनेत लाड – पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्क उमेदवार नियुक्ती प्रक्रियेतील भ्रष्ट कारभारावर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून शिक्कामोर्तब…

◼️त्या पाच’ही नियुक्ती प्रकरणांमध्ये अनियमितता असल्याचा आयुक्त कार्यालयाकडून अहवाल…

◼️मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सिंधुदुर्ग यांना तात्काळ कारवाईचे विभागीय आयुक्तांचे आदेश – प्रसाद गावडे

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴 कुडाळ : दि. २६ महाराष्ट्र शासनाने लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार मेहतर,वाल्मिकी व भंगी समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सफाईगार कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीपश्चात आपल्या कायदेशीर वारसास वारसाहक्काप्रमाणे नोकरी देण्याची तरतूद केली आहे. तथापि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये माहे एप्रिल २०१७ ते माहे मार्च २०२० पर्यंत वारसाहक्काप्रमाणे नोकरी दिलेल्या नियुक्त्यांमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचना डावलून कर्मचाऱ्यांनी पदाचा गैरवापर करत जिल्हा बाहेरील भलत्याच उमेदवारांना नियुक्त्या दिल्याचे मनसेने उघड केलेले होते.

यामध्ये एका प्रकरणात तर हिंदू सफाई कामगाराचा वारस हा ‘मुस्लीम’ समाजाचा व्यक्ती दाखवण्यात आलेला होता तर एका प्रकरणात जि.प.आरोग्य विभागात सफाई कामगार आस्थापना सांभाळणाऱ्या श्री.जाधव या कर्मचाऱ्याचीच पत्नी सफाई कामगाराची वारस दाखवून नियुक्ती देण्यात आली तर एका प्रकरणात चुकीचा वारस दाखवल्याने निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणी जिल्हा बाहेरीलच दुसरा वारस दाखवून नियुक्ती देण्यात आली.

अशाप्रकारे पाचही नियुक्ती प्रकरणात जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या जागी कोल्हापूर,सांगली,नांदेड अशा परजिल्ह्यातील व्यक्तींना वारस दाखवून काही कार्यालयीन एजटांमार्फत लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार होवून भ्रष्टाचार झाल्याने याबाबत मनसेच्या माध्यमातून विभागीय आयुक्त,कोंकण विभाग यांचेकडे माहे जुलै २०२० ला तक्रार सादर केलेली होती.

सदर तक्रारीचे गांभीर्य पाहून विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेले होते.या चौकशी प्रकरणी जिल्हापरिषदेकडील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेवून आयुक्त कार्यालयात वेळोवेळी सुनावणी घेण्यात आलेली होती.या प्रकरणांमध्ये शासन आदेशांची केलेली पायमल्ली,अनियमितता ,भ्रष्ट कारभार,पदाचा गैरवापर आदींबाबत तक्रारदार या नात्याने ११ पृष्ठ पानी लिखित म्हणणं व जबाब सुनावणी दरम्यान चौकशी आयुक्तांसमोर सादर केलेले होता.

सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणसाठी महाराष्ट्र शासनाकडून आजपर्यंचे पारित आदेश,शासन निर्णय,शासन परिपत्रके यांचे अवलोकन करता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील या नियुक्त्यांमध्ये अनियमितता असून चुकीच्या पद्धतीने निवड झाल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कळविण्यात आलेले असून तात्काळ कारवाईसाठी या संबंधीचा गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.

प्रेस व मिडीयाच्या माध्यमातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांना विनंती की, या संबंधीचा चौकशी अहवाल सार्वजनिक करून लाड पागे समितीच्या शिफारशींवरून देण्यात आलेल्या पाचही नियुक्त्या तात्काळ रद्द्पातल करण्यात याव्यात. शिवाय जबाबदार कर्मचाऱ्यांवर पदाचा गैरवापर केले प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करावी.

तसेच या नियुक्त्यामागे असलेले कार्यालयीन कर्मचारी एजंट रॅकेट यांचा पोलीस प्रशासनामार्फत शोध घेवून फौजदारी कारवाई दाखल करावी व सफाई कर्मचाऱ्यांच्या खऱ्या वारसांना न्याय मिळवून द्यावा असे मनसेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!