महाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

आंबोली मान्सून मॅरेथॉनला पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा निर्धार्

आंबोली मान्सून मॅरेथॉनला पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा निर्धार्

विशाल परब यांची घोषणा; महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग

सावंतवाडी, दि. २ : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य आंबोलीत आयोजित करण्यात आलेल्या आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ स्पर्धेला महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांतील शेकडो धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सलग तिसऱ्या वर्षी पार पडलेल्या या स्पर्धेने क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले असून, आंबोलीची पर्यटनस्थळ म्हणून असलेली ओळख अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून या मान्सून मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी घोषणा भाजपचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी केली.
सह्याद्री अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम, आंबोली–सांगेली, सायकलिंग असोसिएशन आणि विशाल सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, सामाजिक कार्यकर्त्या वेदिकाताई परब, पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, प्रथेमेश सावंत, माजी सरपंच सावित्री पालेकर, मायकल डिसोजा, नितीन राऊळ, बाबल आल्मेडा, शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकणातील ग्रामीण भागातील धावपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि आंबोलीला क्रीडा पर्यटनाचा नवा चेहरा देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
धुक्याने वेढलेल्या आंबोलीत रिमझिम पावसाच्या साक्षीने पार पडलेल्या या स्पर्धेत महिला धावपटूंनीही उल्लेखनीय सहभाग नोंदविला. महिलांनी मोठ्या आत्मविश्वासाने स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या वेदिकाताई परब यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. महिला सक्षमीकरण आणि आरोग्यदायी जीवनशैलीला चालना देण्यासाठी अशा स्पर्धांची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेतील विजेते :
२१ किलोमीटर खुला पुरुष गट :
प्रथम : चैतन्य रूपनार – १ तास ८ मिनिटे ५७ सेकंद
द्वितीय : अभिषेक कमान्णा देवकाते – १ तास ९ मिनिटे ३१ सेकंद
तृतीय : अनंत गावंकर – १ तास १० मिनिटे २७ सेकंद
२१ किलोमीटर खुला महिला गट :
प्रथम : साक्षी सुभाष पवार – १ तास ३० मिनिटे ३१ सेकंद
द्वितीय : ममता पाटील – १ तास ३२ मिनिटे ७ सेकंद
तृतीय : रेश्मा पंधारे – १ तास ४४ मिनिटे २८ सेकंद
सुयोग्य नियोजन, स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान आणि स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या प्रभावी व्यवस्थेमुळे सहभागी धावपटूंनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे आंबोलीतील क्रीडा पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक व्यावसायिकांनाही निश्चितच लाभ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यंदाच्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे पुढील वर्षी ही मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!