कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ दशावतार कला ही सातासमुद्रापार गेलेली कोकण ची लोककला..

 

◾ दशावतार लोककलेतील ‘भाव अंतरीचे हळवे’ या नाट्यपदाने जिल्ह्यातील अबालवृद्धांसह लहान मुलांनाही लावले वेड..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा, दि-२२:-  संगीत क्षेत्रात विलक्षण क्रांती झाली आहे. सध्याच्या ऑनलाईन एचडी (दर्जेदार) जमान्यातही कोकणच्या लाल मातीतील लोककला असलेली दशावतार कला आपली वेगळी ओळख जपून आहे. सातासमुद्रापार गेलेली ही लोककला व त्यातील नाट्यसंगीत आजही प्रभावीपणे कोकणातील रसिकांच्या मनात रुंजी घालत आहे. दशावतार लोककलेतील ‘भाव अंतरीचे हळवे’ या नाट्यपदाने जिल्ह्यातील अबालवृद्धांसह लहान मुलांनाही वेड लावले आहे. कित्येकजण मुखात हे नाट्यपद गुणगुणताना दिसत असल्याचे चित्र आहे.
कोकणी माणूस हा नेहमीच सांस्कृतिक व धार्मिक परंपरा प्रामाणिकपणे जपणारा आहे. पाछ्यात्य संस्कृतीचे अनुकरण न करता नेहमीच आपली संस्कृती मिरवणारा कोकणी माणूस आजही आपल्या मातीशी व स्थानिक दशावतार कलेशी प्रामाणिक आहे. येथील जत्रोत्सवात तसेच गावातील धार्मिक कार्यक्रमात हमखास दशावतारी नाट्यप्रयोग ठेवण्यात येतो. या नाट्यप्रयोगाना रसिकांचीही उस्फुर्त दाद मिळते. दशावतार नाटकातील कलाकार, त्या साकारणारी पात्रे ही नाट्यरसिकांची तोंडपाठ असतात. लोकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या या कलेने आपला पारंपरिक साज देखील जपला आहे. कोकणवासीयांची पाहुणचाराची आगळी-वेगळी पद्धत, येथील धार्मिकतेने नटलेली संस्कृती याबरोबरच येथील दशावतार लोककला देखील तितकीच सुपरिचित आहे.
कोकणचा मानबिंदू असणारी दशावतारी पौराणिक कथांवरील नाटके सहसा रात्री सादर केली जातात आणि संपूर्ण रात्रभर चालतात. या लोककलेतील लढाई करण्यापूर्वी सादर होणारे नृत्य आणि सादर होणारे लंगार नाट्यगीत लहान मुले करत आहेत. दशावतारी कलाकारांप्रमाणेच दिड पायांवर लहान मुले या लंगार गीतावर नाचत आहेत. लंगार नृत्य हा एका फेरनृत्याचाच प्रकार असून ते सादर करताना पाय, उडणारे खांदे, मानेची ठेवण आणि शिस्तबद्ध पदन्यास आज अनेक मुला-मुलींकडून साकारताना दिसत आहे.
रसिकांचे मनोरंजन करत त्यांना नितीच्या चार गोष्टी सांगणारी लोककला लोकप्रबोधनाचे साधन आहे. या लोककलेचे शरीर जरी मनोरंजन असले तरी आत्मा हा मात्र प्रबोधनाचा आहे. अन् हेच मनोरंजन आजच्या काळाता लहान मुलांनी आपली कला समजून मोठ्या कौशल्याने मिळेल तेथे प्रस्तुत करताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!