पंधरा वर्षे पाच महिने फुलासारखे जपलेला आमचा समर्थ आज देहाने दूर आहे; पण त्याचे स्मित, त्याची सकारात्मक ऊर्जा आणि निर्मळ हास्य आमच्या प्रत्येक श्वासात कायम जिवंत राहील.
समर्थ गेला… पण जगण्याचे बळ देऊन गेला!
सावंतवाडी –
गेली पस्तीस वर्षे पत्रकारिता करताना समाजातील दिनदुबळे, गरजू, पीडित आणि उपेक्षितांसाठी माझ्या लेखणीचा उपयोग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघापासून सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्याखोऱ्यांपर्यंत जात, धर्म, पंथ, पक्ष यांचा कोणताही भेदभाव न करता अनेकांना माझ्या परीने मदत करण्याचे भाग्य लाभले. पत्रकारिता ही माझ्यासाठी केवळ व्यवसाय नव्हती; ती समाजसेवेची साधना होती.
आज माझ्यावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगी त्या समाजाने, माझ्या वाचकांनी, चाहत्यांनी, हितचिंतकांनी आणि मित्रपरिवाराने ज्या आत्मीयतेने माझ्या कुटुंबामागे उभे राहत आम्हाला शब्दांचा आधार दिला, त्याबद्दल मी आयुष्यभर ऋणी राहीन.
माझा द्वितीय पुत्र समर्थ याच्या जन्माच्या तिसऱ्याच दिवशी छोट्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्या दिवसापासून तब्बल पंधरा वर्षे पाच महिने तो अंथरुणावर होता. अनेकांना वाटेल, हे आयुष्य किती कठीण असेल! पण आमच्यासाठी तो भार नव्हता; तो आमच्या घराचा श्वास होता.
आम्ही त्याला फुलासारखे जपले. त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य कधी मावळू दिले नाही. त्याच्या प्रत्येक दिवसात आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पावलांनी आमच्या घरात प्रवेश केला आणि आमचे प्रारब्धच बदलून गेले. आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धीचे दिवस आले. समर्थ बोलू शकत नव्हता, चालू शकत नव्हता; पण त्याने आम्हाला संयम, प्रेम, स्वीकार आणि जगण्याचा खरा अर्थ शिकवला.
समर्थ आमची सकारात्मक ऊर्जा होता. संकटांशी लढण्याचे बळ होता. आमच्या प्रगतीचा अश्वमेध होता. त्यामुळे त्याची सेवा करताना कधीही ओझे वाटले नाही. त्याची आई, सौ. संयुक्ता गावडे, हे सर्व आनंदाने करत होती. ती आमची जीवनशैली झाली होती.
एक गोष्ट आजही मनाला चटका लावते आणि तितकीच आश्चर्यचकितही करते. आमचा मोठा मुलगा कु. साईश गावडे हा डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. समर्थाने जणू काही भावाच्या अंतिम परीक्षेची वाटच पाहिली. त्याच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून तो शेवटच्या पेपरपर्यंत आमच्यासोबत राहिला आणि परीक्षा पूर्ण होताच, बुधवार दि. १५ जुलै २०२६ रोजी रात्री १० वाजता शांतपणे अखेरचा श्वास घेतला.
तो दिवस दत्तावतार टेंबे स्वामी यांच्या पुण्यतिथीचा होता. दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ५ मिनिटांनी, श्रीपाद श्रीवल्लभ दत्तगुरूंच्या गुरुवारी, ब्रह्ममुहूर्तावर त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. हे सारे योगायोग होते की समर्थानेच सर्व काही आधीच ठरवून ठेवले होते, असा प्रश्न आजही मनात येतो.
खरे तर मला दुसरा मुलगा आहे, हे नव्वद टक्के लोकांना माहीतच नव्हते. त्यामुळे “पुत्रशोक” हे शब्द वाचून अनेक जण हादरले. संपूर्ण बातमी वाचल्यानंतर त्यांना वास्तव समजले. त्यानंतर जे घडले, ते आयुष्यभर विसरणे अशक्य आहे.
दुसऱ्या दिवसापासून आमच्या घरी सांत्वनासाठी येणाऱ्यांची अक्षरशः रीघ लागली. सलग दहा दिवस, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत हा ओघ थांबला नाही. जवळपास पंधराशेहून अधिक जणांनी घरी येऊन आम्हाला धीर दिला. प्रत्येक जण एकच म्हणत होता, “तुमच्या चेहऱ्यावर इतके मोठे दुःख कधीच जाणवले नाही.”
हे खरे आहे. कारण आमच्या चेहऱ्यावरचे हास्य, आमच्या मनातील धैर्य आणि आमच्या आयुष्यातील आशा यांचे मूळ समर्थच होता. त्यानेच आम्हाला खंबीर राहायला शिकवले. म्हणूनच त्याच्या जाण्याचे दुःख अमर्याद असले, तरी त्याने दिलेली जिद्द त्याहून मोठी आहे.
आज समर्थ देहाने आमच्यात नाही. पण त्याच्या हातांचे आणि पायांचे आम्ही जपून ठेवलेले ठसे आमच्यासाठी अमूल्य ठेवा आहेत. ते ठसे आम्हाला प्रत्येक क्षणी सांगतील—सत्यासाठी लढा, माणुसकी जपा, संकटांपुढे कधीही हार मानू नका.
समर्थचे अस्तित्व आमच्या घरात, आमच्या श्वासात, आमच्या आठवणीत आणि आमच्या प्रत्येक चांगल्या कार्यात कायम जिवंत राहील.
आमच्या दुःखात सहभागी झालेल्या सर्व नातेवाईकांचे, मित्रांचे, पत्रकार बांधवांचे, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे, माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आम्ही मनःपूर्वक ऋणी आहोत. तुमच्या प्रेमाने आणि आधाराने हे असह्य दुःख पेलण्याचे बळ आम्हाला मिळाले.
– सीताराम गावडे (बाबा)
– सौ. संयुक्ता गावडे (आई)
– कु. साईश गावडे (भाऊ)
तसेच संपूर्ण गावडे, सावंत व बिरोडकर परिवार,
सावंतवाडी – बिरोडकर टेंब.

