महाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी जिमखान्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारचा निधी; पालकमंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

सावंतवाडी जिमखान्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारचा निधी; पालकमंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

नगराध्यक्षा चषक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन; “टीकेकडे दुर्लक्ष करा, विकासावर भर द्या”, क्रीडा क्षेत्राला सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन

सावंतवाडी | प्रतिनिधी :
सावंतवाडीच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाची घोषणा करत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी स्पोर्ट्स जिमखान्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यासाठी नगरपरिषदेकडून तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्व. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज स्मृती ‘नगराध्यक्षा चषक’ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जागतिक बॅडमिंटन दिनानिमित्त आयोजित स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी स्वतः बॅडमिंटन खेळून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
पालकमंत्री राणे म्हणाले, आजची तरुणाई मोबाईलच्या आहारी जात असताना अशा क्रीडा स्पर्धा त्यांना मैदानाकडे आकर्षित करणाऱ्या आहेत. खेळामुळे शिस्त, संघभावना, नेतृत्व आणि जिद्द विकसित होते. सिंधुदुर्गात गुणवंत खेळाडूंची कमतरता नाही. योग्य सुविधा आणि संधी मिळाल्यास येथील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करू शकतात. अशा खेळाडूंच्या पाठीशी राज्य सरकार कायम उभे राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांच्या कामाचे कौतुक करत त्यांनी टीकाकारांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला. “यशस्वी व्यक्तीवरच सर्वाधिक टीका होते. त्यामुळे टीकेला भीक घालू नका. विकासाची वाटचाल सुरू ठेवा. आव्हानात्मक परिस्थितीत काम करण्यातच खरी मजा आहे,” असे सांगत नगरपरिषदेने क्रीडा क्षेत्रात उचललेल्या पावलांचे त्यांनी स्वागत केले.
बॅडमिंटनसह इतर सर्व क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत, सावंतवाडीला आधुनिक क्रीडा सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखमराजे भोसले, रेश्मा सावंत, प्रमोद सावंत, मोहिनी मडगांवकर, दीपाली भालेकर, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते. सहभागी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पालकमंत्र्यांनी स्पर्धेला शुभारंभ केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!