ड्रग्स, मटका, अवैध दारूचा जिल्ह्यातून कायमचा बंदोबस्त; मुख्य सूत्रधारांवर थेट घाव!” – पालकमंत्री नितेश राणे
ड्रग्स, मटका, अवैध दारूचा जिल्ह्यातून कायमचा बंदोबस्त; मुख्य सूत्रधारांवर थेट घाव!” – पालकमंत्री नितेश राणे
“गुन्हेगाराचा पक्ष, जात, धर्म पाहणार नाही; सिंधुदुर्ग ड्रग्समुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही… अणूऊर्जा प्रकल्पालाही स्पष्ट नकार”
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ड्रग्स, मटका, अवैध दारू आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात आता निर्णायक लढाई सुरू झाली असून, केवळ किरकोळ विक्रेत्यांवर नव्हे तर या रॅकेटचे मुख्य सूत्रधार आणि पुरवठादार यांच्यावर थेट कारवाई केली जात असल्याची ठाम घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली. नुकत्याच झालेल्या मोठ्या कारवाईत एका प्रमुख आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीद्वारे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या धर्तीवरच सिंधुदुर्ग जिल्हा पूर्णपणे ड्रग्स, मटका आणि अवैध धंदेमुक्त करण्याचा निर्धार सरकारने केला असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. “गुन्हा करणारा कोणत्याही पक्षाचा, जातीचा किंवा धर्माचा असो, तो फक्त गुन्हेगार आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचा इशाराही दिला.
गोवा बनावटीची अवैध दारू, मटका-जुगार, ड्रग्स तसेच बीफच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असून, अवैध धंद्यांचे संपूर्ण उच्चाटन होईपर्यंत प्रशासन स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. गेल्या वर्षभरात गांजा सेवन करणाऱ्यांपासून ते विक्रेत्यांपर्यंत अनेकांवर कठोर कारवाई करण्यात आली असून, या संपूर्ण नेटवर्कचे धागेदोरे प्रशासनाकडे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विकासाच्या मुद्द्यावर बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही अणूऊर्जा प्रकल्प होणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला सरकारची मान्यता नसल्याचे सांगत त्यांनी केवळ राजकीय द्वेषातून विकास प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली.
जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागू नये, यासाठी स्थानिक स्तरावर उद्योग आणि गुंतवणूक वाढविण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होऊ नये, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढावा आणि स्थानिक युवकांना आपल्या मातीतच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. देवगड आणि सिंधुदुर्गमधील जागरूक युवकांच्या बळावरच विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत स्थानिक रोजगार निर्मितीचे आश्वासन त्यांनी दिले.

