कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

ओरोस येथे महामार्गावर धडक कारवाई; सावंतवाडीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, अन्नसुरक्षा कायद्यासह विविध कलमांखाली कारवाई

सिंधुदुर्गात गुटखा माफियांवर एलसीबीचा मोठा प्रहार! ३०.१३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त

ओरोस येथे महामार्गावर धडक कारवाई; सावंतवाडीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, अन्नसुरक्षा कायद्यासह विविध कलमांखाली कारवाई

सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) पुन्हा एकदा धडक कारवाई करत तब्बल ३० लाख १३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले असून अवैध तंबाखू व्यवसायाला मोठा हादरा बसला आहे.

ही कारवाई ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ओरोस येथील खर्येवाडी, खालसा पंजाबी ढाब्यासमोरील गोवा-मुंबई महामार्गावर करण्यात आली.

या प्रकरणी गोपाळ राजाराम गवस (वय ३४, रा. वाफोली-अन्नपूर्णावाडी, ता. सावंतवाडी), शिरीष सुभाष गवळी (वय ३५, रा. माठेवाडा, सावंतवाडी) आणि सिद्धेश सुभाष केसरकर (वय ३४, रा. आळेवाडी, बांदा, ता. सावंतवाडी) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी कारवाईदरम्यान २१ लाख ६३ हजार ४५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ तसेच ८ लाख ५० हजार रुपये किमतीचे अशोक लेलँड ‘बडा दोस्त’ वाहन असा एकूण ३० लाख १३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २६(२), ७(३)(ड), २७(३)(इ), ३०(२)(ए), ५९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) अन्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हनुमंत भोसले, एएसआय सुरेश राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल विल्सन डिसोझा, आशिष जामदार तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजीसकर आणि ऋषिकेश टोपले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी सुरू ठेवलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!