कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात एलसीबीची धडाकेबाज कारवाई! एक कोटी ५० लाखांचा गोवा बनावटीच्या दारूसाठा जप्त

सिंधुदुर्गात एलसीबीची धडाकेबाज कारवाई! एक कोटी ५० लाखांचा गोवा बनावटीच्या दारूसाठा जप्त

ओरोस येथील जिजामाता चौकात टाटा सिग्मा ट्रकसह राजस्थानातील चालक ताब्यात; महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल

सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध मद्य तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) शनिवारी पहाटे मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गोवा बनावटीची मोठ्या प्रमाणावर दारू, टाटा सिग्मा दहा टायर ट्रक आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई ४ जुलै २०२६ रोजी पहाटे १.४५ वाजण्याच्या सुमारास गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जिजामाता चौक, ओरोस येथे करण्यात आली. या प्रकरणी विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९, रा. लोलावत का मोहल्ला, धर्कदा, उदयपूर, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात गोवा बनावटीची दारू किंमत १ कोटी १५ लाख २० हजार रुपये, टाटा सिग्मा दहा टायर ट्रक किंमत ३५ लाख रुपये आणि मोबाईल फोन किंमत १० हजार रुपये असा एकूण १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३३६(२)(३), ३४०(२), ३(५) अन्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हनुमंत भोसले, पीएसआय अनिल हाडळ, एएसआय सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोजा तसेच पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वर समजिस्कर आणि ऋषिकेश टोपले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध दारू तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत तस्करांचे धाबे दणाणून सोडले असून, अशा कारवायांमुळे अवैध मद्य व्यवसायाला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!