पुण्यात मोठी कारवाई : बुधवार पेठेत ६ बांगलादेशी महिलांना ताब्यात; वेश्या व्यवसायाच्या नावाखाली अवैध वास्तव्य उघड
पुण्यात मोठी कारवाई : बुधवार पेठेत ६ बांगलादेशी महिलांना ताब्यात; वेश्या व्यवसायाच्या नावाखाली अवैध वास्तव्य उघड
डीसीपी कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहीम; ११ महिन्यांत १०३ अवैध बांगलादेशी नागरिकांना पकडून देशाबाहेर पाठविण्याची कारवाई
पुणे : पुणे शहरात आज रात्री पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या शहरव्यापी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान बुधवार पेठ परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. फरासखाना पोलीस ठाणे व खडक पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने सागर बिल्डिंगवर छापा टाकून भारतात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या ६ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. या महिलांविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (झोन १) कृषिकेश रावले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार करण्यात आली. चौकशीदरम्यान संबंधित महिलांनी धक्कादायक माहिती उघड केली. भारतात त्यांना ब्युटी पार्लर, शिवणकाम किंवा घरगुती काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणण्यात आले होते. मात्र बुधवार पेठेत आल्यानंतर त्या स्वेच्छेने वेश्या व्यवसायात सहभागी झाल्याचे समोर आले आहे.
या महिलांना भारतात कोणी आणले, त्यांनी सीमा कशी ओलांडली, तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे कशी मिळवली याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
विशेष म्हणजे, डीसीपी कृषिकेश रावले यांनी झोन १ चा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधातील कारवाईला मोठे यश मिळाले असून, आतापर्यंत १०३ जणांना पकडून त्यांच्यावर देशाबाहेर पाठविण्याची कारवाई करण्यात आली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे :
१) कल्पना कमल शेख (वय ३८)
२) राणी रफिक शेख (वय ४२)
३) लकी हालेन्ग मंडल (वय ४०)
४) पूजा रफिक शेख (वय २०)
५) रुमा जानी शेख (वय ३०)
६) निशी शाहजहान धाली (वय २९)
दरम्यान, डीसीपी कृषिकेश रावले हे एका महिन्याच्या प्रशिक्षणासाठी आज रात्री हैदराबादला रवाना होत असून, त्यांच्या अनुपस्थितीत डीसीपी मुख्यालय पी. आर. पाटील यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे.

