◾जीवनाला नवी दिशा, ऊर्जा आणि सकारात्मकता देऊन गेला महाराष्ट्राचा ५४ वा निरंकारी संत समागम
◾ वास्तविक मनुष्य होण्यासाठी आपल्यात मानवी गुण असणे आवश्यक ; सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
🖥️ Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी: संतोष पिलके
🎴चिपळूण, दि-०३ :- आपण स्वत:ला वास्तविक मनुष्य म्हणवून घेत असू तर आपल्यामध्ये मानवी गुण असण्याची नितांत गरज आहे. या विपरीत कोणतीही भावना मनामध्ये येत असेल तर स्वतःचे मूल्यांकन करावे लागेल, सूक्ष्म नजरेने मनाच्या तराजूत तोलून पहावे लागेल. असे केले तर आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला उमगू शकेल.असे प्रेरणादायी विचार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या तीन-दिवसीय ५४व्या वार्षिक संत समागमाच्या समारोप प्रसंगी काढले. २८ फेब्रुवारी रोजी या संत समागमाची यशस्वीपणे सांगता झाली.
व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आलेला हा तीन-दिवसीय संत समागम जीवनाला एक नवी दिशा, ऊर्जा आणि सकारात्मकता देऊन गेला. समागमाचे थेट प्रसारण निरंकारी मिशनची वेबसाईट तसेच संस्कार टी.व्ही. चॅनलच्या माध्यमातून करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यासह देश-विदेशातील लाखो निरंकारी भक्तांनी तसेच अन्य भाविक सज्जनांनी घरबसल्या या संत समागमाचा भरपूर आनंद प्राप्त केला.
सद्गुरु माता सुदीक्षाजी म्हणाल्या, की वास्तविक मनुष्य होण्यासाठी सकळजनांवर प्रेम करणे, सर्वांच्या प्रति सहानुभूती बाळगणे, उदारमतवादी होऊन इतरांच्या दोषांकडे दुर्लक्ष करुन त्यांच्यातील सद्गुण ग्रहण करणे, सर्वांना समदृष्टीने पाहणे आणि आत्मवत भावनेने इतरांचे दुःखदेखील स्वतःच्या दुःखासमान मानणे यांसह इतरही अनेक मानवी गुणांनी युक्त होण्याची आवश्यकता आहे.
माता सुदीक्षाजी यांनी पुढे सांगितले, की मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो, आपल्या धर्मातील गुरु-पीर-पैगंबरांच्या वचनांचे पालन करण्याचा दावा करतो. आपली कुठेही श्रद्धा असू द्या, प्रत्येक ठिकाणी मानवता हाच खरा धर्म असून ईश्वराशी नाते जोडून आपले जीवन सार्थक करावे अशीच शिकवण दिली गेल्याचे आढळते. जीवन अनमोल आहे. कोणत्याही वयात असलेला मनुष्य ब्रह्मज्ञानी संतांच्या सान्निध्यात येऊन ईश्वराला क्षणार्धात जाणू शकतो.
संत समागमाच्या पहिल्या दिवशी सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितले, की ईश्वराला कोणत्याही नावाने संबोधित करा. तो सर्वव्यापी असून कणकणवासी आहे. प्रत्येकाचा आत्मा हा निराकार ईश्वराचाच अंश आहे. आम्हाला स्वतःची खरी ओळख करुन घ्यायची असेल तर आधी परमात्म्याची ओळख करुन घ्यावी लागेल. कारण ब्रह्मानुभूतीनेच आत्मानुभूती शक्य आहे.
सद्गुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले, की आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक स्थितीचे आकलन करण्यासाठी, शरीराचे उचित संचालन करण्यासाठी ज्ञानेंद्रियांचा वापर करावा, मात्र त्यांच्या अधीन होऊ नये. इंद्रिये आपल्या नियंत्रणात असतील तर आपण त्यांचा सदुपयोग करुन घेऊ शकतो. याकरिता इंद्रियांमध्ये गुंतून न जाता त्यांना आपल्या काबूत ठेवायचे आहे.
कवि दरबार
समागमाच्या तिसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण होते बहुभाषी कवी संमेलन, ज्याचे शीर्षक ‘स्थिरतेशी नाते मनाचे जोडून, जीवन आपले सहज करुया’ असे होते. या विषयावर आधारित मराठी, हिंदी, सिंधी, गुजराती, पंजाबी आणि भोजपूरी भाषांमधून कित्येक कविंनी आपल्या कविता सादर केल्या.
समागमाच्या तिन्ही दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या भागातील तसेच जवळपासच्या राज्यांसह देशाच्या काही प्रांतांतील व विदेशातील अनेक वक्त्यांनी विविध भाषांतून आपले प्रेरणादायी विचार व्यक्त केले. याशिवाय संपूर्ण अवतार बाणी आणि संपूर्ण हरदेव बाणीतील पावन पदांचे कीर्तन, पुरातन संतांची अभंगवाणी तसेच मिशनच्या गीतकारांनी तयार केलेल्या प्रेरणादायी भक्तीरचना प्रस्तुत करुन मिशनच्या विचारधारेवर आधारित सारगर्भित संदेश प्रसारित करण्यात आला.

