कळसुलकर हायस्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात २७ फेब्रुवारी रोजी कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात आणि आकर्षक स्वरूपात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करण्यासाठी कविता, भाषण, अभंग, गझल, भारूड आणि वेशभूषेच्या माध्यमातून सादरीकरण केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सूर्यकांत भुरे, प्रमुख वक्ते व कॉलेज प्रमुख श्री. उत्तम पाटील, श्रीमती मिनल घटवाळ आणि आलेखा नाईक यांनी उपस्थित राहून मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी आजच्या तरुण पिढीने साहित्याचे वाचन केले पाहिजे आणि मातृभाषेतून शिक्षण घेऊन तिचा अभिमान अबाधित ठेवला पाहिजे, असा मोलाचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी भूमिका घाडी हिने केले. तसेच १८ फेब्रुवारी रोजी इयत्ता अकरावीच्या वर्गात घेण्यात आलेल्या शुद्धलेखन व हस्ताक्षर स्पर्धेतील विजेते कुमारी निशिधा तुळसकर, प्रणिता जाधव आणि वंशिका म्हालटकर यांचा माननीय मुख्याध्यापकांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा करून उपस्थित होते. विषय शिक्षक श्री. प्रसाद कोलगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी भाग्यश्री इंगवले हिने केले.

