कोकणराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी नगरपालिकेच्या सभेत ऑनलाईन उपस्थितीवरून वाद निरर्थक*

*सावंतवाडी नगरपालिकेच्या सभेत ऑनलाईन उपस्थितीवरून वाद निरर्थक*

*रजेवर असतानाही शहर विकासासाठी सक्रिय राहणार – नगराध्यक्षा श्रद्धा लखमसावंत भोसले*

सावंतवाडी | प्रतिनिधी :
सावंतवाडी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. २४ फेब्रुवारी) पार पडली. या सभेत नगराध्यक्षा श्रद्धा लखमसावंत भोसले या मुंबईहून ऑनलाईन झूमद्वारे सहभागी झाल्या; मात्र काही नगरसेवकांनी त्यांच्या ऑनलाईन उपस्थितीला विरोध दर्शवल्याने सभागृहात वाद निर्माण झाला.
नगराध्यक्षा भोसले सध्या प्रसूती रजेवर असून, महिनाभरापूर्वी रजेवर जाताना त्यांनी नागरिकांना शहराच्या विकासासाठी सक्रिय राहण्याचे आश्वासन दिले होते. बैठकीस ऑनलाईन उपस्थित राहण्याबाबत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पूर्वकल्पना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.रजेवर असलेल्या नगराध्यक्षांना ऑनलाईन बैठकीत सहभागी होता येत नाही, असा कोणताही नियम अस्तित्वात नाही. मी लोकनियुक्त प्रथम नागरिक असून शहराच्या प्रगतीची माहिती घेणे हे माझे कर्तव्य आहे,” असे भोसले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
*“ही केवळ माझी नव्हे, महिला वर्गाचीही अवहेलना”*
आपल्या भूमिकेत त्यांनी नमूद केले की, प्रसूती रजा ही कोणत्याही आजारपणामुळे नसून मातृत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी घेतलेली आहे. अशा परिस्थितीत ऑनलाईन उपस्थितीला विरोध करणे हे सावंतवाडीच्या सुसंस्कृत परंपरेला शोभणारे नाही.“भारत हा स्त्रीचा सन्मान राखणारा देश आहे. कोरोना काळापासून ऑनलाईन प्रणाली रूढ झाली आहे. अनेक मंत्री, आमदार, प्रशासकीय अधिकारी ऑनलाईन बैठकींना उपस्थित राहतात. मग सावंतवाडीमध्ये त्याला विरोध का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांच्या मते, हा प्रकार केवळ नगराध्यक्ष पदाचा नाही तर महिला सन्मानाचाही प्रश्न आहे.
*विकासाच्या अजेंड्यावर ठाम भूमिका*
नगराध्यक्षा भोसले यांनी स्पष्ट केले की, त्या लवकरच सावंतवाडीत येणार असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील मुद्द्यांवर भर देणार आहेत :मुबलक आणि शाश्वत पाणीपुरवठा,स्वच्छ व सुंदर सावंतवाडी अभियान,पर्यटन विकासाला चालना आरोग्य व रोजगाराभिमुख प्रकल्प,युवक व महिलांसाठी कौशल्याधारित उपक्रम
क्रीडा व पायाभूत सुविधांचा विकास
“केंद्र व राज्यातील महायुती सरकारच्या सहकार्याने विकासकामे गतीमान करायची आहेत. एकमेकांविरोधात उभे राहून शहराचा विकास रोखायचा नाही. संकुचित मनोवृत्ती बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
सावंतवाडीची जनता शांत, सुसंस्कृत व सुज्ञ असल्याचा विश्वास व्यक्त करत, “जनतेच्या हितासाठी काम करणे आणि दिलेली वचने पूर्ण करणे हेच माझे ध्येय आहे,” असे शेवटी त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!