सावंतवाडीत हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचा शुभारंभ; अभिनेते अभिनय बेर्डे यांची उपस्थिती
सावंतवाडीत हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचा शुभारंभ; अभिनेते अभिनय बेर्डे यांची उपस्थिती
सावंतवाडी, प्रतिनिधी :
“माझे वडील अभिनेते कै. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी संपूर्ण सिनेसृष्टीला व्यवसाय कसा करायचा हे शिकवलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ त्यांना ‘पक्का वाणी’ म्हणायचे. वडिलांवर हा संस्कार आपल्या समाजानं केला,” असे भावनिक उद्गार अभिनेता अभिनय बेर्डे यांनी काढले.
सावंतवाडी येथे आयोजित हिंदू वैश्यवाणी युवा संघटना स्थापनेच्या शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते. मराठी माणसाला व्यवसाय कळत नाही, असा गैरसमज असल्याचे सांगत, “तो आपल्या कष्टाळू बांधवांना भेटला नाही. मराठी युवक-युवती मोठ्या प्रमाणावर उद्योग-व्यवसायात उतरावेत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
*भव्य बाईक रॅलीने शहर दणाणले*
हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेच्या स्थापनेनिमित्त सावंतवाडी वैश्य भवन येथून शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर अभिनेता अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हस्ते संघटनेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.
युवा संघटनेच्या अध्यक्षपदी अमित गवंडळकर यांची निवड झाल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष सुनिल भोगटे यांनी केली.
*मान्यवरांची उपस्थिती*
या सोहळ्यास माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष रमेश बोंद्रे, महिला अध्यक्षा तनुजा पोकळे, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
*मान्यवरांचे मनोगत*
माजी मंत्री आमदार दीपक केसरकर म्हणाले, “हिंदू वैश्यवाणी युवा संघटना म्हणजे समाजासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. युवकांतील ऊर्जा सकारात्मक कामात वळवली तर उद्योजक घडतील.”
माजी आमदार राजन तेली यांनी बाजारपेठा ओस पडत असताना व्यापार-उद्योग वाढीसाठी युवा संघटनेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
*मान्यवरांचा सत्कार व विशेष सन्मान*
या कार्यक्रमात समाजातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
सामाजिक बांधिलकीची घोषणा युवा संघटना अध्यक्ष अमित गवंडळकर यांनी संघटनेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटलसाठी १० हजार रुपयांची मदत जाहीर केली.भविष्यात युवक व महिलांसाठी विविध उपक्रम राबविणार असून जिल्ह्यात स्वतंत्र महिला व युवक संघटना स्थापन करण्याचा मानस असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोगटे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुईली पांगम व उमा तिळवे शिरसाट यांनी केले. आभार प्रदर्शन सल्लागार अरूण भिसे यांनी केले.
सिंधुदुर्गात वैश्य समाजाची एकजूट आणि युवा शक्तीचा भक्कम पाया या सोहळ्याने अधोरेखित केला.

