धनशक्तीच्या वणव्यावर केसरकरांचा घणाघात; “लोकशाही वाचवण्यासाठी सखोल चौकशी करणार!”
धनशक्तीच्या वणव्यावर केसरकरांचा घणाघात; “लोकशाही वाचवण्यासाठी सखोल चौकशी करणार!”
सावंतवाडी : आजच्या काळात केवळ धनशक्तीच्या जोरावर निवडणूक लढवणे आणि जिंकणे सोपे राहिलेले नाही. सावंतवाडी मतदारसंघात अपक्ष उमेदवारांसाठी ज्या प्रकारे पैशांचा वणवा पेटवण्यात आला, तो लोकशाहीसाठी अत्यंत घातक प्रकार आहे, असा घणाघाती आरोप माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केला. सावंतवाडी येथे आयोजित नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
निवडणुकीतील आर्थिक व्यवहारांवर कडक ताशेरे ओढताना केसरकर म्हणाले, “लोकशाहीत पैशांचा असा वारेमाप वापर होणे ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. हे प्रकार नेमके कोणी केले, याची सखोल माहिती घेऊन वरिष्ठांचे लक्ष वेधणार आहोत.” काही उमेदवारांचा अल्प मतांनी पराभव झाला असला तरी त्यांनी खचून जाऊ नये. पराभवातून धडा घेत अधिक जोमाने संघटनेसाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी न्हावेली पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य शरद धाऊसकर यांच्यासह इतर विजयी उमेदवारांचा केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “जनतेने ज्या विश्वासाने कौल दिला आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी आतापासूनच कामाला लागा. लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांची कामे मार्गी लावणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे.” विकासकामांसाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला मिळालेले यश समाधानकारक असल्याचे सांगत, आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या महिनाभरात प्रत्येक गावात जाऊन नव्या युवा पिढीला संघटनेशी जोडण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या सत्कार सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सचिन वालावलकर, प्रेमानंद देसाई, गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

