अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांच्या बॅनर वर किंगमेकर म्हणून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बॅनरवर उल्लेख
बॅनर लावले कोणी? काढले कोणी? सावंतवाडीत ‘किंगमेकर’ पोस्टरवरून खळबळ!
मायकल डिसोझांचा संबंध नसल्याचा खुलासा; नगरपरिषद अनभिज्ञ
सावंतवाडी : शहरात लावण्यात आलेल्या वादग्रस्त बॅनरप्रकरणी अखेर काही तासांतच नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपचे बंडखोर आणि अपक्ष कोलगाव जिल्हा परिषद सदस्य ॲड. मायकल डिसोजा यांच्या संदर्भातील ‘किंगमेकर’ असा उल्लेख असलेले बॅनर तात्काळ हटविण्यात आले. मात्र हे बॅनर नेमके लावले कुणी आणि काढले कुणी? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे.
या बॅनरवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा ‘किंगमेकर’ असा उल्लेख करण्यात आला होता. तसेच मायकल डिसोजा यांचा वडील हे प्रेरणास्थान असल्याचेही नमूद करण्यात आले होते. शहरातील प्रमुख ठिकाणी, अगदी नगरपरिषदेसमोरही हे बॅनर झळकत होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
दरम्यान, या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा स्पष्ट खुलासा ॲड. मायकल डिसोजा यांनी केला. “मला या बॅनरबाबत कोणतीही माहिती नाही. कार्यकर्त्यांकडून बॅनर लावण्यात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र हे बॅनर माझ्याकडून लावण्यात आलेले नाहीत. ज्यांनी ते लावले असतील त्यांनीच ते हटवावेत,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
विशेष म्हणजे, हे बॅनर नगरपरिषदेकडून हटविण्यात आलेले नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. नगरपरिषदेसमोरच बॅनर असतानाही कर्मचाऱ्यांनी याबाबत अनभिज्ञता दर्शविली. त्यामुळे या बॅनरला अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का? हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.
काही तासांत बॅनर लावले जाणे आणि तेवढ्याच वेगाने हटविले जाणे, यामागे नेमके कोणाचे डोके आहे? हा ‘पब्लिसिटी स्टंट’ होता की अंतर्गत राजकीय संदेश? सावंतवाडीतील या ‘किंगमेकर’ बॅनरप्रकरणाने आता अनेक शंकांना जन्म दिला असून राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे.
सावंतवाडीकरांना मात्र एकच प्रश्न पडला आहे —
हे बॅनर लावलं कुणी… आणि काढलं कुणी?

