बांद्यातून राजकीय एल्गार; राणे समर्थकांची महासुनामी कणकवलीत धडकली
*बांद्यातून राजकीय एल्गार; राणे समर्थकांची महासुनामी कणकवलीत धडकली*
*राणेंच्या नेतृत्वाखाली कोकण पेटलं; बांदा ते कणकवली शक्तीप्रदर्शन*
सावंतवाडी | प्रतिनिधी
महाराष्ट्र–गोवा सीमेवरील बांदा आज साक्षीदार ठरला तो कोकणातील राजकारणात मोठा भूकंप घडवणाऱ्या शक्तीप्रदर्शनाचा!माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राणे समर्थकांची महाशक्ती एल्गार रॅली दिमाखात पार पडली आणि संपूर्ण कोकणात राजकीय चर्चांना उधाण आलं.बांदा येथे नारायण राणेंचं जंगी, जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राणे कुटुंबाची ताकद दाखवणाऱ्या या रॅलीत पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर तसेच सौ. नीलमताई राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमुळे रॅलीला केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक आणि ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झालं.या महाशक्ती एल्गार रॅलीत २५०० हून अधिक गाड्यांचा भव्य ताफा सहभागी झाला होता. “जय नारायण”, “राणे साहेब आगे बढो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हजारोंच्या संख्येने राणे समर्थक आणि राणे प्रेमी बांद्याहून कणकवलीच्या दिशेने रवाना झाले.
बांदा ते झाराप – कुडाळ – ओरोस – कसाल मार्गे ही रॅली कणकवलीकडे जात असताना प्रत्येक ठिकाणी राणेंच्या समर्थकांनी फटाके, ढोल-ताशे आणि घोषणांनी रॅलीचं स्वागत केलं. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक, युवक आणि महिला मोठ्या संख्येने या
शक्तीप्रदर्शनाचे साक्षीदार ठरले.
कणकवली येथे रॅलीचा भव्य समारोप झाला. यावेळी झालेल्या नारायण राणेंच्या भाषणाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य संचारलं. “कोकणाचा विकास, स्वाभिमान आणि राजकीय ताकद ही राणेंच्या नेतृत्वाखालीच सुरक्षित आहे,” असा स्पष्ट संदेश या भाषणातून देण्यात आला.
ही रॅली म्हणजे केवळ शक्तीप्रदर्शन नव्हतं, तर आगामी राजकीय रणसंग्रामाची नांदी असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलं. महाराष्ट्राच्या राजकारणात राणे हे नाव आजही निर्णायक आहे, हे बांद्यापासून कणकवलीपर्यंत उसळलेल्या या महाशक्ती एल्गार रॅलीने पुन्हा एकदा ठामपणे दाखवून दिलं.

