कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*कोकणात पहिले सैनिक स्कूल! चराठे येथे ‘भोसले सैनिक स्कूल’ला संरक्षण मंत्रालयाची मान्यता*

*कोकणात पहिले सैनिक स्कूल! चराठे येथे ‘भोसले सैनिक स्कूल’ला संरक्षण मंत्रालयाची मान्यता*

*संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अच्यूत भोसले यांची पत्रकार परिषदेत माहिती*

सावंतवाडी, ता. ८ : प्रतिनिधी
कोकणाच्या शैक्षणिक इतिहासात आज एक नवे सुवर्णपान लिहिले गेले आहे. संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक स्कूल सोसायटी, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित ‘भोसले सैनिक स्कूल’ या संस्थेला नुकतीच अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. या मान्यतेमुळे चराठे (ता. सावंतवाडी) येथे कोकणातील पहिले सैनिक स्कूल उभारले जात असून, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय दर्जाचे सैनिकी शिक्षणाचे नवे दालन खुले होणार आहे.
आज आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोंसले यांनी या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा, तसेच जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये उपस्थित होते.
श्री. भोंसले म्हणाले की, देशभरात सध्या ३३ सैनिक स्कूल्स कार्यरत असून, त्यांच्या एकत्रित प्रवेश क्षमतेपेक्षा मागणी अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अलीकडेच ६९ नवीन सैनिक स्कूल्सना मान्यता दिली असून, त्यापैकी ‘भोसले सैनिक स्कूल’ हे कोकण विभागातील पहिले मान्यता प्राप्त विद्यालय ठरत आहे.
हे विद्यालय Public Private Partnership (PPP) या मॉडेलवर कार्यरत राहणार असून, येथे अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, सैनिकी प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवनशैली आणि नेतृत्वगुणांचा संगम साधला जाणार आहे. ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातच राष्ट्रीय दर्जाचे सैनिकी शिक्षण मिळावे, हा शाळेचा मुख्य हेतू असल्याचे श्री. भोंसले यांनी सांगितले.
दरवर्षी सहावी आणि नववी इयत्तेत प्रवेश घेतला जाणार असून, एकूण १६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. यापैकी ४० जागा विद्यार्थिनींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘भोसले सैनिक स्कूल’ हे कोकणातील पहिले सहशिक्षणात्मक सैनिक स्कूल ठरणार आहे. महिला सबलीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
ले. कर्नल रत्नेश सिन्हा म्हणाले, “भोसले सैनिक स्कूल हे केवळ शिक्षणाचे केंद्र नाही, तर भविष्यातील सैन्य अधिकारी आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे ध्येयस्थान आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा आणि कोल्हापूर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हे एक सुवर्णसंधीचे ठिकाण ठरणार आहे.”
या शाळेमुळे विद्यार्थ्यांना NDA आणि इतर संरक्षण सेवांमध्ये प्रवेशासाठी मोठा फायदा होईल. कॅम्पसमध्ये शैक्षणिक इमारती, ट्रेनिंग ब्लॉक्स, हॉस्टेल्स, ड्रिल ग्राउंड, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदी अत्याधुनिक सुविधांची उभारणी सुरू आहे.
या शाळेचे भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी चराठे येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया औपचारिकरीत्या सुरू होणार असून, All India Sainik School Entrance Examination (AISSEE) मार्फत प्रवेश घेण्यात येणार आहे.ले. कर्नल सिन्हा यांनी सांगितले की, उद्या ९ नोव्हेंबर ही AISSEE परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी तत्काळ अर्ज करावा, असे आवाहन त्यांनी केले.
भोसले सैनिक स्कूलच्या स्थापनेमुळे कोकणात सैनिकी शिक्षणाची नवी पहाट उगवली असून, “राष्ट्रीय सेवेसाठी सज्ज तरुणाई घडविण्याचे स्वप्न आता चराठेत साकारते आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!