पालकमंत्री नितेश राणेंच्या गडात राजन तेलींची एंट्री! शिवसेनेचा ‘मीठबाव मिशन’ सुरू* .
*पालकमंत्री नितेश राणेंच्या गडात राजन तेलींची एंट्री! शिवसेनेचा ‘मीठबाव मिशन’ सुरू* .
*काठावर उभे असलेले निष्ठावंत शिवसैनिक पुन्हा सक्रिय होणार*
देवगड –
देवगड तालुक्यातील मीठबाव गावात शिवसेनेचे नव्याने प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांनी पक्षप्रवेशानंतरची पहिलीच सभा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत तेली यांनी कार्यकर्त्यांना ठाम शब्दांत विश्वास दिला — “मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे!”
. राजन तेली यांनी घेतलेल्या या सभेने केवळ देवगडच नव्हे, तर कणकवली मतदारसंघातही राजकीय खळबळ माजवली आहे. कारण ही सभा पालकमंत्री नितेश राणे यांच्या मतदारसंघात झाली असून, “कणकवलीच्या भविष्यातील राजकीय बांधणीसाठीच ही चाचपणी आहे का?” अशी कुजबूज आता ऐकू येऊ लागली आहे.
या बैठकीला संजय आंग्रे, संदेश पटेल, अमोल लोके यांसारखे स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी “जय शिवसेना!” च्या घोषणा देत सभेला उत्साहाचा रंग चढवला.
कुडाळ-मालवण मतदारसंघात पक्षप्रवेशाचा धडाका लावल्यानंतर आता राजन तेलींचा फोकस देवगड–कणकवली–वैभववाडी या पट्ट्याकडे वळला आहे. आतापर्यंत या मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक हालचाल शांत होती, मात्र तेलींच्या एन्ट्रीनंतर “शिवसेनेचं इंजिन इथे पेटलंय” असं कार्यकर्त्यांमधून ऐकू येत आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की, राजन तेली गुप्त बैठका घेत कार्यकर्त्यांना एकत्र आणत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी शांतपणे गाठीभेटी घेतल्या असून, “जुने निष्ठावंत, नाराज, व नवोदितांना एका छत्राखाली आणणे” हेच त्यांचे लक्ष्य असल्याचे बोलले जात आहे.
राजन तेलींच्या या हालचालींमुळे शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे भाजप व राणे गटाच्या खेम्यात “ही चाले कुठे नेतील?” असा सवाल उपस्थित होत आहे. देवगडात मीठबावपासून सुरू झालेला हा राजकीय वादळाचा पहिला झोत, कणकवलीत कुठे किनाऱ्याला लागतो, हे आगामी काळच ठरवेल!

