आरोग्य संचालकांचा दौरा ठरला औपचारिक — सावंतवाडीकरांच्या अपेक्षांवर पाणी!
आरोग्य संचालकांचा दौरा ठरला औपचारिक — सावंतवाडीकरांच्या अपेक्षांवर पाणी!
सावंतवाडी : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या समस्यांचा थेट आढावा घेण्यासाठी आरोग्य संचालक विरेंद्र सिंह सावंतवाडीत दाखल झाले होते. परंतु त्यांच्या या भेटीकडून सावंतवाडीकरांना जशा अपेक्षा होत्या, त्या मात्र पूर्ण झाल्या नाहीत. पाहणी संपताच श्री. सिंह यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया न देता दौरा आटोपता घेतला आणि निघून गेले.
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे, अनेक प्रकल्प ठप्प पडले आहेत, रुग्णालयातील गंभीर तक्रारी प्रलंबित आहेत — अशा पार्श्वभूमीवर सिंह यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार त्यांच्या भेटीकडे उत्सुकतेने पाहत होते. मात्र, त्यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे टाळले.
सावंतवाडीतील नागरिकांचे म्हणणे आहे की, “उच्चपदस्थ अधिकारी जिल्ह्यात येतात, पाहणी करतात, पण त्यांच्या भेटींचे परिणाम मात्र शून्य राहतात.” न्यायालयाने दणका दिल्यानंतरच संचालक जागे झाले, ही वस्तुस्थिती आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रियतेकडे बोट दाखवणारी आहे.
गंभीर प्रश्न प्रलंबित, प्रकल्प रखडलेले, आणि त्यावर उपाययोजना न जाहीर करता गेलेले संचालक – यामुळे सावंतवाडीकरांमध्ये नाराजी उसळली आहे. त्यांच्या या “औपचारिक दौऱ्याची” जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू असून, “हा दौरा दाखवण्यासाठी होता की खरं आरोग्य सुधारण्यासाठी?” असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे.

