आणखी

आरोग्याच्या दुरवस्थेवर न्यायालयाची झापड – आता पालक सचिव वीरेंद्रसिंह प्रत्यक्ष तपासणीला!

*आरोग्याच्या दुरवस्थेवर न्यायालयाची झापड – आता पालक सचिव वीरेंद्रसिंह प्रत्यक्ष तपासणीला!*

 

सावंतवाडी –

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या बेफिकिरीवर उच्च न्यायालयाने नुकतीच कडक फटकार मारत समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. या समितीकडून जिल्ह्यातील रुग्णालयांची खरी परिस्थिती जाणून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर आता राज्य शासनानेही सजग भूमिका घेतली असून, महाराष्ट्र शासनाचे पालक सचिव तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव श्री. वीरेंद्रसिंह हे स्वतःच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वा. ते सावंतवाडी उपविभागाच्या विविध शासकीय कार्यालयांना आणि आरोग्य केंद्रांना भेट देणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी आणि बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, डॉक्टरांची अनुपस्थिती, औषधांची टंचाई, आणि रुग्णांना होत असलेले हाल यामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला होता. याच पार्श्वभूमीवर समाजसेवक आणि अभिनव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ओंकार तुळसुलकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर उच्च न्यायालयाने आरोग्य विभागाला जाब विचारत कडक निर्देश दिले.

‌. आता त्यानंतर फक्त तीन दिवसांतच पालक सचिवांचा जिल्हा दौरा निश्चित झाल्याने आरोग्य यंत्रणा तहहयात मोडमध्ये गेली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने गडबडीत स्वच्छता मोहीम, फाईल्स तपासणी आणि दाखवायच्या तयारीला सुरुवात केली आहे.

‌. याबाबत स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “शासनाचे अधिकारी आले की एक दिवस झाडलोट आणि दाखवायची कामे सुरू होतात, पण प्रत्यक्षात रुग्णालयातील वेदना मात्र कायमच राहतात.”

सावंतवाडी तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेला उच्च न्यायालय आणि आता सचिवस्तरावरून मिळालेला हा थेट धडा प्रशासनाला जाग आणणारा ठरतो का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

*सावंतवाडीतील दौऱ्याचा कार्यक्रम:*

सकाळी ९.३० वा. – उपविभागीय अधिकारी कार्यालय, सावंतवाडी

तहसिलदार कार्यालय, सावंतवाडी

पंचायत समिती, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी

प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा

या दौऱ्यामुळे आरोग्य विभागातील फसवेगिरी आणि प्रत्यक्ष परिस्थितीतील फरक समोर येणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. आता पाहावे लागेल, सचिव वीरेंद्रसिंह यांच्या भेटीनंतर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या सुधारण्याचे खरे औषध मिळते का, की नेहमीप्रमाणेच फाईलपुरते उपचार सुरू राहतात!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!