आजगांव मध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक
सावंतवाडी ते शिरोडा मार्गांवर आजगाव येथे दोन एसटी बस मध्ये आज दुपारी ३. ३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. अपघात एवढा मोठा होता की दोन्ही एसटी बस गाड्यांचे दर्शनी भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातातील एक एसटी बस ही वेंगुर्ले वरून पणजी च्या दिशेने जात होती तर दुसरी बस ही सावंतवाडी वरून शिरोडा च्या दिशेने जात होती, आजगाव माळयारवाडी वाघबीळ येथे समोरासमोर येऊन धडकल्या.त्यामुळे दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागांचे मोठे नुकसान झाले आहे.सतत पडणाऱ्या पावसामुळे हा अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बस मधील प्रवाशांना बाहेर काढून तसेच वाहक,चालक यांना अधिक उपचारासाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहीना शिरोडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनास्थळी शिरोडा पोलीस दाखल झाले आहेत,हा अपघात रस्त्याच्या मध्यभागी झाल्याने दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या आहेत, पोलिसांकडून त्वरित दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

