शेर्ले पाडलोस कास येथे आदर्श कडधान्य पीक पाहणी.
शेर्ले, कास, पाडलोसमध्ये आदर्श कडधान्य पिक प्रात्यक्षिकाची पाहणी
बांदा ः प्रतिनिधी
पारंपरिक पद्धतीने घेतले जाणारे कडधान्य पिकांचे उत्पादन मर्यादित असते. शास्त्रीय पद्धतीने अंतरात पेरणी, बिजप्रक्रिया, विद्राव्य खते व किटकनाशकाचा वापर केल्यास उत्पादना फरक पडतो. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पडीक जमीन न ठेवता एकत्रीत येऊन शास्त्रीय पद्धतीने कडधान्याचे उत्पन्न घेण्याचे आवाहन, सावंतवाडी उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे यांनी केले.
पाडलोसमध्ये आदर्श कडधान्य पिकाच्या प्रात्यक्षिकाची पाहणी दरम्यान श्री.अडसुळे बोलत होते. यावेळी बांदा मंडळ कृषी अधिकारी रुपाली पापडे, पाडलोस कृषी सहाय्यक श्वेता सावंत, शेतकरी सुर्यकांत नाईक, विश्वनाथ नाईक, कृषी सहाय्यक नंदकुमार ठाकरे, विश्वनाथ शिवपूरे, यशवंत सावंत उपस्थित होते.
शेर्ले, कास व पाडलोसमध्ये पारंपरिक व शास्त्रीय पद्धतीने उत्पन्न घेतल्यास उत्पादनात पडणारा फरक अनुभवण्याकरीता विनाअनुदानिक तत्वावर आदर्श कडधान्य प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गटाने किंवा एकत्र येऊन पिकांचे उत्पन्न घेतल्यास त्याचा मोठा फायदा होतो. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत त्याचा लाभ त्यांनी घ्यावा. शेकडो एकर जमीन पडीक आहे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी समुहाने शेती करून आपला उत्कर्ष साधावा, असे आवाहन अजित अडसुळे यांनी केले. शेतकरी म्हणाले की, आम्हाला अनुदान नको परंतु आम्ही उत्पन्न घेत असलेल्या पिकाचे गव्या रेड्यांपासून संरक्षण करा मात्र यावर अधिकारीच निरूत्तर झाले.

