सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपने कमळ निशाणीवर लढवावा
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपने कमळ निशाणीवर लढवावा
कार्यकर्त्यांची मागणी घेऊन विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट
लेखी निवेदनाद्वारे केली मागणी
सावंतवाडी विधानसभा मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीचा गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. या मतदार संघातील 70% ग्रामपंचायत या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत, तसेच या मतदार संघात 17 पैकी 13 एवढे जिल्हा परिषद सदस्य व 34 पैकी 28 पंचायत समिती सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. या मतदार संघात असलेल्या तीनही नगरपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत. या मतदार संघातील बहुतांश, खरेदी-विक्री संघ, सोसायटी या भारतीय जनता पार्टीकडे आहेत त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांची विधानसभा निवडणूक भाजपने कमळ निशाणी वर लढवावी अशी मागणी विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
केवळ युतीच्या माध्यमातुन कार्यकत्यांचा कोणताही संच सोबत नसताना येथील महायुतीचे आमदार दिपक केसरकर हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांच्या भरवश्यावर निवडणुक लढवू पाहत आहेत, त्यांच्यासोबत मुळ शिवसेनेतील कार्यकर्ते किवा पदाधिकारी आले नाहीत, हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसुन आले. या मतदार संघात शिवसेना (उबाठा) गटाच्या उमेदवारांना 53.593 एवढी मते पडली आहेत. याचाच अर्थ असा की मुळ शिवसेनेचा मतदार हा जैसे थे आहे. श्री दिपक केसरकर यांच्या बद्दल या मतदार संघात प्रचंड नाराजी आहे.
भाजपने हा मतदारसंघ 2014 पूर्वी कधीही लढवला नव्हता, युतीच्या वाटाघाटीत अगदीच 3 जिल्हा परिषद किंवा 4 ते 5 पंचायत समिती एवढेच 2014 पूर्वी लढवायला मिळाले. तरी आपल्याला या मतदार संघातील तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांची विनंती आहे की, हा मतदारसंघ विधानसभेला महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीवर लढण्याची संधी मिळावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.