वेत्ये येथे आढळलेला मानवी सांगाडा पुरुष जातीचा -मिळालेल्या कपड्यांवरून अंदाज
वेत्ये येथे आढळलेला मानवी सांगाडा पुरुष जातीचा -मिळालेल्या कपड्यांवरून अंदाज
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये रस्तावाडी
येथे मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कैलास धाबा या हॉटेल परिसरात मंगळवारी संध्याकाळी उशिरा मानवी सांगाडा आढळून आला होता. याबाबत स्थानिक पोलिस पाटील रमेश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात खबर दिली होती. बुधवारी पोलिसांनी या परिसरात पाहणी केली असता घटनास्थळी निळ्या रंगाची बरमुडा आणि पांढऱ्या मळकट रंगाचे शर्ट आढळून आल्याने सदरचा सांगाडा हा पुरुष जातीचा मानवी सांगाडा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदरचा सांगाडा सोलापूर येथे डीएनए टेस्ट साठी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात येणार आहे. वेत्ये रस्तावाडी येथे मानवी सांगाडा असल्याची खबर सावंतवाडी पोलिसांना मंगळवारी सायंकाळी समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तो सांगाडा जप्त करण्यात केला. कैलास धाब्याच्या पाठीमागे असलेल्या जंगलात हा सांगाडा काहींना दिसून आला त्यांनी याबाबतची खबर ग्रामस्थांना दिल्यानंतर पोलिसांना कल्पना देण्यात आली.
हा मानवी सांगाडा नेमका कोणाचा याबाबत पोलिसांच्या हाती घटनास्थळी तसेच तपासातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे सदरचा सांगाडा हा सोलापूर येथे डीएनए टेस्ट साठी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात येणार असल्याचे तपासी अधिकारी उपनिरीक्षक नितीन नरळे यांनी सांगितले. तसेच घटनास्थळी निळा रंगाची बरमुडा आणि पांढर्या मळकट रंगाचे शर्ट आढळून आल्याने प्राथमिक तपासात हा पुरुषाचा सांगाडा असल्याचे पुढे आले असले तरी तो नेमका कोणाचे हे समजू शकले नाही असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, परिसरातील कोणी बेपत्ता आहे का याबाबतही माहीती घेतली असता कोणी बेपत्ता नसल्याचे आढळून आले. त्यामुळे इतरही काही पोलीस ठाण्यामधून कोणी बेपत्ता आहे का याबाबतची माहिती घेतली जाणार आहे. तसेच या मानवी सांगाड्याचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

