गोगटे-वाळके महाविद्यालयात शाश्वत पर्यटन आणि कचरा व्यवस्थापन या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
गोगटे-वाळके महाविद्यालयात शाश्वत पर्यटन आणि कचरा व्यवस्थापन या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
बांदा
येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि लेखाशास्त्र विभागामार्फत ‘शाश्वत पर्यटन आणि कचरा व्यवस्थापन : ग्रामीण भारतासाठी उद्योजकतीची नवीन क्षेत्र’ या विषयावर शनिवार दिनाक १७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले.या चर्चासत्राच्या बीजभाषण सत्रासाठी सुप्रसिद्ध पर्यावरणवादी युवा कार्यकर्ते व कोकणी रानमाणूस युट्युब चॅनेलचे संचालक श्री.प्रसाद गावडे यांनी उदबोधन केले
प्रसाद गावडे म्हणाले की,शाश्वत पर्यटन नावाचे असे काही नसून मानव प्राणी हा निसर्गातीलच एक घटक असल्याने त्याची जीवनशैली निसर्गाशी मिळतीजुळती असली की, निसर्गाला वेगळी स्वतंत्र शाश्वतता देण्याची गरज भासत नाही.जुन्या काळात कोकणात नैसर्गिक जीवनशैलीला फारच महत्त्व होते. पर्यटनासाठी त्याचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ मातीची घरे,देवराई, राहण्यासाठी मांगर, कोकणी खाद्य संस्कृती इत्यादी.या चर्चासत्रासाठी गोवा, कोल्हापूर,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले व त्यांनी सुमारे 20 शोधनिबंध सादर केले.दोन तांत्रिक सत्रामध्ये झालेल्या या चर्चासत्रामध्ये कचरा व्यवस्थापनामधील उद्योजकता,शाश्वत पर्यटन शेतकऱ्यांना उपयुक्त,शाश्वत पर्यटनाचे विविध प्रकार आदी विषयांवर शोधनिबंध सादर झाले. उपस्थित सहभागी प्रतिनिधींनी व स्थानिक ग्रामस्थांनी श्री.प्रसाद गावडे यांच्याशी सुसंवाद साधला व नैसर्गिक जीवनशैलीचे पर्यटनासाठी महत्त्व विशद केले.शारदा एज्युकेशन सोसायटी,गोवा या संस्थेचे संचालक श्री. शैलेंद्र आलोरनेकार यांनी या चर्चासत्रासाठी आर्थिक सहकार्य केले.संस्था पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोविंद काजरेकर यांनी हे चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.संपूर्ण चर्चासत्र आयोजन करण्यासाठी समन्वयक डॉ.ए. पी.महाले,वाणिज्य विभागप्रमुख प्रा. उमेश परब आणि प्रा.रमाकांत गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.