सावंतवाडीत २२ रोजी डॉ. आंबेडकर स्मृती जागर
सावंतवाडीत २२ रोजी डॉ. आंबेडकर स्मृती जागर
सावंतवाडी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका न्यायालयीन खटल्यासाठी २२ ऑक्टोबर १९३२ रोजी सावंतवाडी संस्थानला दिलेल्या भेटीला येत्या रविवारी ९१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीतर्फे स्मृती प्रबोधन जागर तथा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी नगरपालिकेने उभारलेल्या स्मृती उद्यानात हा कार्यक्रम सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. सकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या हस्ते होणार असून यावेळी आंबेडकरी चळवळीतील कवी अजय कांडर यांचे बाबासाहेब समजून घेताना’ या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे. तर कार्यक्रमाला गोव्याचे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माटे, कै. टिपको पडवेकर यांचे वारसदार संजय कदम (पडवे), राजेंद्र कदम (मालवण), वाय. जी. कदम (वेंगुर्ले), संतोष कदम (वैभववाडी), सुरेश जाधव (दोडामार्ग), अंकुश कदम वि भावना कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दीपक पडेलकर हे राहणार आहेत. दुपारच्या दुसऱ्या सत्रात ‘फुले शाहू आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी सांस्कृतिक प्रतीकाची गरज आहे का?’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीचे सचिव मोहन जाधव यांनी केले आहे.