बागायतीची आग विझविताना होरपळून माजी सैनिक अत्यवस्थ
बागायतीची आग विझविताना होरपळून माजी सैनिक अत्यवस्थ
शॉर्टसर्किटमुळे एकाच दिवशी दोन ठिकाणी आग
महावितरणचा गलथान कारभार
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
मडुरा डिगवाडी परिसरात गुरुवारी महावितरणच्या विद्युतवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होऊन दोन ठिकाणी काजू बागायतींना आग लागण्याची घटना घडली. आग विझविताना ६५ वर्षीय शेतकरी तथा माजी सैनिक दशरथ देसाई हे अत्यवस्थ झालेत.बांदा येथे खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. महावितरण विभागाला कळवूनही घटनास्थळी कोणीही न आल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त केला.
मडुरा गावात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची ही यंदाची पाचवी घटना आहे.सहाय्यक अभियंत्यांसह लाईनमन व वायरमन कोणतीही कार्यवाही करीत नसल्यामुळे दिवसेंदिवस शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.मात्र याचे सोयरसुतक नसल्याच्या आविर्भावात महावितरणचे अधिकारी वागत आहे.केवळ बीले वसुलीकरिता कार्यतत्पर असलेले कर्मचारी सेवा पुरविण्यात कामचुकारपणा करीत असल्याने शेतकरी व स्थानिकांमध्ये तीव्र संताप आहे.
मडुरा डीगवाडी येथील परुळेकर यांच्या कारखान्या नजीकच्या काजू बागायतीला शॉर्टसर्किट होऊन दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आग लागली.शेतकरी प्रकाश वालावलकर यांनी आपल्या कामगारांसह धाव घेत आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले.यात उत्तम वालावलकर, पूर्वा धुरी, समिक्षा धुरी, सुवर्णा धुरी, सानवी धुरी, शिवानी शेळके यांचा समावेश होता.
तर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्याच परिसरात वरच्या दिशेने शॉर्टसर्किट होऊन आग लागली.आग विझविण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले.मात्र, दुपारची वेळ असल्याने ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले. माहिती देऊनही महावितरणसह शासकीय यंत्रणेने मात्र घटनास्थळी उशिरापर्यंत पाठ फिरविली.

