वागदेत दुचाकी अपघातात माय-लेक जखमी
वागदेत दुचाकी अपघातात माय-लेक जखमी
कणकवली
ओरोसच्या दिशेने दुचाकीने जात असताना अचानक मांजर आडवे आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील शुभांगी आत्माराम गावडे (७२) व त्यांचा मुलगा सत्यवान आत्माराम गावडे (३८, चौकुळ ता. सावंतवाडी) हे दोघेही जखमी झाले. हा अपघात महामार्गावरील वागदे- डंगळवाडीनजीक मंगळवारी सकाळी ११ वा. सुमारास घडला. जखमींना याच मार्गाने जात असलेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. एलसीबीचे हवालदार राजू जामसंडेकर, आशिष गंगावणे, रवी इंगळे यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातात शुभांगी यांच्या डोकीला तर सत्यवान यांच्या हाताला दुखापत झाली. डॉ. संतोष चौगुले यांनी जखमींवर तातडीने उपचार केले. शुभांगी व सत्यवान हे काही कामानिमित्त ओरोसला आले होते. मात्र, ओरोस लक्षात न आल्याने ते वागदेपर्यंत पुढे आले. तेथून परत ओरोसला जाताना हा अपघात घडला. दरम्यान, दोन्ही जखमींना कणकवलीतून ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती कणकवली रुग्णालयातून देण्यात आली.

