मोती तलावाची कोसळलेली “ती” भिंत बांधण्यास होणारा विलंब लक्षात घेता अधिकाऱ्यांचा मुजोरपणा प्रकर्षाने दिसून येतो-साळगांवकर
सावंतवाडी : शहरातील निसर्ग संपन्न मोती तलावाची कोसळलेली “ती” भिंत बांधण्यास होणारा विलंब लक्षात घेता अधिकाऱ्यांचा मुजोरपणा प्रकर्षाने दिसून येत आहे, असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला. दरम्यान वारंवार मागणी करून सुद्धा बांधकाम विभाग याची कोणतीच दखल घेत नसल्याने त्यांच्या निषेधार्थ १७ डिसेंबरला तलाव परिसरात सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. तर हे काम सुरू झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
याबाबत साळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले. त्यात नसे नमूद करण्यात आले आहे की, येथील मोती तलावाची भोसले उद्यान परिसरात भिंत कोसळून गेले सात आठ महिने उलटले आहेत. दिवसेंदिवस हा भाग आणखीनच खचत चालला आहे. त्याची दुरुस्ती व्हावी अशी सर्वांकडूनच आग्रही मागणी होत आहे. अनेकांनी आंदोलने उपोषणे छेडण्याचा इशाराही दिला. यावेळी निधी अभावी काम रखडल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
साळगावकर यांनी दोन आठवड्यापूर्वी याकडे बांधकामच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता. या कामासाठी निधी प्राप्त झाला आहे. आणि लवकरच हे काम सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे यावरून अधिकाऱ्यांची मुजोरी प्रकर्षाने दिसून येत आहे. आता या कामाला सुरुवात होण्यासाठी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. याच पार्श्वभूमीवर १७ डिसेंबरला तलाव परिसरात सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे, असे साळगावकर यांनी सांगितले.
तर जोपर्यंत कामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या त्यांच्या निर्णयाला माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, अफरोज राजगुरू, सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव, राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरसेकर, दिलीप पवार, मनवेल फर्नांडिस, छावा संघटनेचे अध्यक्ष संतोष तळवणकर आदींनी अनुमोदन दिले आहे.

