फेसबूक लाईव्ह करीत आत्महत्येचा प्रयत्न
फेसबूक लाईव्ह करीत आत्महत्येचा प्रयत्न
कणकवली
कणकवली शहरातील एका आळीतील युवकाने फेसबूक लाईव्ह करून गळफासाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या युवकाने गळफास लावून टेबलवरून उडीही घेतली. मात्र, जवळच राहणाऱ्या एका मित्राच्या हा प्रकार फेसबूक लाईव्हमुळे लक्षात आला. त्याने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी त्या युवकाच्या घरी धाव घेत त्याला तातडीने खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. युवकावर उपचार सुरू आहेत. घटनेची पोलिसांत मात्र नोंद नव्हती. बुधवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास शहरातील एका आळीतील युवकाचा फेसबूक लाईव्ह व्हीडिओ अचानक दिसून आला. प्रारंभी कोणाच्या काही लक्षात आले नाही. मात्र, नंतर हा युवक एक दोरी घेऊन घराच्या वाशाला बांधताना व दुसरे टोक गळ्यात घालताना दिसून आला. त्यानंतर शेजारी असलेल्या एका मित्राने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने तात्काळ नातेवाईकांना कळविले. तोपर्यंत या युवकाने गळ्यात दोरी अडकवून -टेबलवरून उडी घेतली होती. यावेळी नातेवाईकांनी त्याला खाली उतरवून तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असून रात्री उशिरापर्यंत सदर युवक शुद्धीवर आला नव्हता.

