राष्ट्रीय नेमबाजीसाठी शमीतची निवड
राष्ट्रीय नेमबाजीसाठी शमीतची निवड
सावंतवाडी :
केरळमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी सावंतवाडीतील आरपीडी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शमीत लाखे याची निवड झाली आहे. इंदूर येथे नववी वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच आयोजित केली होती. ही स्पर्धा १० मीटर पीप साईट प्रकारात घेण्यात आली. यात पाच राज्यांतून ९३३ स्पर्धक सहभागी झाले होते. शमीत याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना युथ गटात सहभाग घेऊन ४०० पैकी ३७३ गुणांची नोंद करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले. यापूर्वी कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमधून शमीत याची निवड पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी होती. शमीत हा सावंतवाडी येथील उपरकर शूटिंग रेंजवर नेमबाजीचा सराव करत असून त्याला प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण, तर आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले.

