कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मळगांव मधील रस्ते व पुलांची दुरुस्ती तसेच नव्या रस्ते व पुलांची निर्मिती मालिका भाग -1

🛑 मळगांव मधील देऊळवाडी येथील रस्ते गटारात बुजले तर दोन्ही पुल आगामी पावसाळ्यात पुरात वाहून जाण्याची स्थिती..

🛑 राजकीय नेत्यांची फक्त आश्वासने आणि पहाणी..

🛑 ग्रामस्थ तथा स्थानीक सामाजिक कार्यकर्ते यांचा दुरुस्ती न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशारा..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनीधी : सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-२९ :- “गावातील पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणाऱ्या हंगामी ओहळांवरील पुल तसेच गावातील अनेक वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करा आणि संभाव्य आर्थिक व दळणवळण याबरोबरच संभाव्य जीवितहानी टाळा ” अशा आशयाची मागणी ग्रामपंचायत पातळी ते महाराष्ट्र सचिवालय (मंत्रालय) पर्यंत ग्रामस्थ तसेच समाजसेवक व राजकीय नेत्यांकडून होऊनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. यामुळे मळगांव मधील देऊळवाडी येथील रस्ते गटारात व पुल ओहळात वाहून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागील अनेक वर्षात याबाबत मागण्या होऊनही आणि अलीकडच्या काळात या मागण्याचा तगादा लावण्यात येऊनही यासाठी निधी आणून दुरुस्ती होण्यास तसेच शासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे लागत असलेल्या विलंबाबाबत तीव्र संताप व नाराजी आहे. जर हा रस्ता व दोन्ही पुल आगामी पावसाळा येण्यापूर्वी दुरुस्त न झाल्यास किंवा तशी कार्यवाही लवकर सुरु न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा मळगांव ग्रामस्थ तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांनी दिला आहे.

गावच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जोडलेला आणि जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली गावातील जनतेच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेला कित्येक वर्षांपासूनचा जुना रस्ता अशी ओळख! मात्र हा रस्ता अजूनही आहे त्याच स्थितीत आहे. या रस्त्याचे नुतनीकरण आणि रस्त्यावरील पुलांची डागडुजी अनेक वर्षे झालेली नाही. यामुळे हा नादुरुस्त रस्ता असलेल्या मळगांव गावातील देऊळवाडी येथील ग्रामस्थ आणि गावातील वाहन चालक-मालक व पादचारी यांना ये-जा करण्यासाठी प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. मात्र या रस्त्याची दुरुस्ती जिल्हाधिकारी प्रशासनाकडून होत नसल्याने अखेरीस गावातील काही दानशूर व्यक्तीना श्रमदानातून आणि अर्थ दानातून करावी लागते या सारखे दुर्दैव आणखी कोणते असू शकेल? होय! ही दुर्दैवी वस्तूस्थिती सावंतवाडी तालुक्यातील मळगांव गावात निर्माण झाली आहे. मळगांव गावातील बौद्धवाडी ते ब्राम्हण आळी (म्हारकाटा) पर्यंतचा रस्ता गावातील महत्वाचा रस्ता असून मागील अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. हा रस्ता व या रस्त्यावर देऊळवाडी येथे असलेले दोन ओहळांवरील पुल पुर्णपणे मोडकळीस आले आहेत. हे दोन्ही पुल पावसाळ्यातील पुरात केव्हाही वाहून जाण्याच्या स्थितीत आले असतानाही आणि हे पुल ऐन पुरा वेळी वाहून गेल्यास या पुल परिसरात राहणारे ग्रामस्थ आणि या पुलांचा वापर करणारे पादचारी, वाहनधारक यांना आपल्या घरापर्यंत पोहचण्यासाठी योग्य असा दुसरा पर्याय नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

ही अतिगंभीर बाब ध्यानात घेऊन गावातील राजकीय व्यक्तींप्रमाणेच सामाजिक कार्यकर्ते, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व ह्या रस्त्याचा वापर होणाऱ्या देऊळवाडी येथील माळीचेघर मधील तसेच या पुलांचा व रस्त्याचा वापर होणाऱ्या पाडगावकर वाडी, मांजरेकर वाडी, सावळवाडी,बौद्धवाडी, लातयेवाडी, जोशी वाडा येथील ग्रामस्थांनी हा नादुरुस्त रस्ता व रस्त्यावरील दोन्ही पुलांची दुरुस्ती अर्थदान व श्रमदानाने करुन मागील काही वर्षात तात्पुरती सोय केली. मात्र येत्या पावसाळ्यात हा रस्ता व पुल पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची दाट शक्यता दिसत आहे. यामुळे येथील माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर तसेच पांडुरंग हळदणकर, नवनाथ राऊळ, नरेश सावंत, विवेकानंद राऊळ, नागेश राऊळ, निळकंठ बुगडे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निकिता बुगडे, देवदास गवंडे, विलास मळगांवकर, शेखर पाडगावकर, टिळक सावळ, तेजपाल सावळ, पांडुरंग बुगडे,विश्वंभर गोसावी, विराज गोसावी, शिवराम नेमळेकर, वंदना हळदणकर, गोविंद लागते, दिपक जोशी, उदय सावळ, अमित कळंगुटकर, सिद्धेश कळंगुटकर व अन्य ग्रामस्थ यांनी, मागील वर्षी दिनांक 18 फेब्रुवारी 2021 व या वर्षी दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी ” दुरावस्थ रस्ता आणि विदीर्ण पुलांचे पुन निर्माण करणे बाबत स्मरणपत्र” या विषयांतर्गत लेखी निवेदने मळगांव ग्रामपंचायत, सावंतवाडी पंचायत समिती, जिल्हा प्रशासन ते महाराष्ट्र शासन व केंद्र शासन पातळीवर सरपंच, आमदार, खासदार व मंत्री तसेच पालकमंत्री यांच्याकडे सादर करुनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

बौद्धवाडी ते म्हारकाटा पर्यंतचा

रस्ता व रवळनाथ मंदिर, देऊळवाडी येथील दोन ओहळांवरील पुल व्हावेत यासाठी यापूर्वी ही अनेक नेते व सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले असून यामध्ये सावंतवाडी पंचायत समितचे माजी सभापती राजू परब यांनी सुद्धा देऊळवाडी येथील सदरील रस्ता व दोन्ही पुलांची दुरुस्ती या विषयांतर्गत निवेदन सादर करुन येथील ग्रामस्थांना सुविधा निर्माण करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. तर गणेशप्रसाद पेडणेकर यांनी केलेल्या प्रयत्नांतर्गत खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, ओरोस व उप अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम कार्यालय मळगांव, ता. सावंतवाडी यांना दिलेल्या आदेश पत्रात, ” दुरावस्थ रस्ता आणि विदीर्ण पुलांचे पुन निर्माण करणेबाबत ” या आदेश विषयांतर्गत, ” या रस्त्याची फारच दुरावस्था झालेली असून सदर रस्त्यावरील दोन्ही पुलांना भगदाड पडली आहेत. गटारे ही बुजलेली असल्याने संबधित विभाग अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली असून या पत्राची त्वरित दखल घेऊन, “या रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी करुन या रस्त्याच्या डांबरीकरण, मजबुतीकरण व पुलांची पुन्हा बांधणी तसेच साईड पट्टी गटाराबाबत अंदाजपत्रके तयार करुन ही कामे पुर्ण होण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा तपशील माहितीसाठी आपल्याकडे पाठविण्यात यावा” असे आदेश दिले आहेत.

दरम्यान जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता टेमकर यांनी, या कामांचा अहवाल कार्यकारी अभियंता यांना पाठवला असल्याचे समजते. तर आमदार दिपकभाई केसरकर यांनीही या कामांसाठी पुन्हा निवेदन सादर केले असून जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी ही लवकरच या कामांची पुर्तता केली जाईल असे आश्वासन दिले आहे. मात्र तरीही कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसत नसल्याने आता शेवटचा उपाय म्हणून या ग्रामस्थांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील दोन वर्षात या ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनात, ” आम्ही ग्रामस्थ तथा प्रशासकीय औदासीन्या मुळे हवालदिल झालो आहोत. यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ आपणांस कळकळीची विनंती करीत आहोत. आपणाकडून सकारात्मक निर्देशांचा आणि आंत कार्यालयीन समन्वयाची अपेक्षा करीत आहोत. बौद्धवाडी ते म्हारकाटा हा गावातील महत्वाचा रस्ता असून येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिर याच रस्त्यालगत आहे. यामुळे या रस्त्यावर वर्दळ व वाहतूक नेहमीच असते. मात्र गेली कित्येक वर्षे सततचा पाठपुरावा करूनही प्रशासकीय दुर्लक्ष व अन्य काही कारणांमुळे हा रस्ता व पुल दुरावस्थेत राहिला आहे. इतकेच नव्हे तर मडवळ तिठा ते झाराप-पत्रादेवी महामार्ग सर्कल दरम्यानच्या रस्त्यातील गटारे बुजल्याने, डांबरीकरण पुर्णपणे वाहून गेल्याने, बगलपट्ट्या तुटल्याने आणि मोठमोठे खड्डे पडल्याने सुमारे एक किलोमीटरहून अधिक लांबीच्या या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांतर्गत असलेले कमी उंचीचे दोन्ही पुल पूर्णतः जीर्ण- विदीर्ण झाले आहेत. दोन्ही पुलांना मोठमोठी भगदाड पडली आहेत. ही भगदाड चिरे-माती टाकून हे खड्डे तात्पुरत्या स्वरुपात रुजवण्याचा केविलवाणा प्रयत्नही करण्यात आला. मात्र कोणताही फायदा झालेला नसून यावर्षी ही तात्पुरती दुरुस्ती करण्याची वेळ येऊ नये.

या समस्यांमुळे येथील ग्रामस्थांना या रस्त्यावरुन चालणे व तेथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक करण्यास जिकरीचे ठरत आहे. तसेच या दोन्ही पुलांवरून पावसाळ्यात गुरा-ढोरांची ने-आण ने-आण करणे ही धोकादायक बनले आहे. शाळकरी मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक यांच्या दृष्टीनेही या रस्त्यावरील रहदारी त्रासदायक ठरते आहे. जेणेकरून त्यांना जीव मुठीत धरुन पुल ओलांडावे लागत आहेत.दोन्ही पुल कमी उंचीचे असल्याने पावसाळ्यात बऱ्याच वेळा दोन्ही पुलांवरून ओढ्याचा पाणी दुथडी भरुन वाहत असते. अशा परिस्थितीत या भागातील ग्रामस्थांचा उर्वरित गावाशी संपर्क तुटतो. त्यांना शेतीविषयक अडचणींना संघर्ष करावा लागतो. तसेच गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरही समस्या निर्माण होते.

मागील काही वर्षांत गावातील या जीवघेण्या समस्येविषयी विविध प्रशासकीय यंत्रणांकडे व वारंवार प्रत्यक्ष भेट घेऊनही तसेच गाऱ्हाणे मांडूनही प्रशासनाला या समस्येची दखल घ्यावीशी वाटली नाही. मात्र ग्रामस्थांनी प्रशासनावरील आपला विश्वास ढळू दिलेला नसून या भाबड्या विश्वासाने या ग्रामस्थांनी पुन्हा नव्याने निवेदन सादर केले आहे. यामुळे शेवटचा उपाय म्हणून येत्या 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी लोकतांत्रिक पद्धतीने धरणे आंदोलन छेडून न्याय मिळविण्याचा मानस बाळगला आहे. ही बाब ध्यानात ठेऊन याबाबत लवकरात लवकर ठोस पावले उचलून प्रशासकीय यंत्रणेने कार्यवाही करुन हा रस्ता व दोन्ही पुल आगामी पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करुन ही गंभीर समस्या निकालात काढावी अशी मागणी होत आहे. अन्यथा आम्हांला प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन करावे लागेल असा इशारा देताना, “जोपर्यंत कार्यवाही होणार नाही तोपर्यंत आम्ही आम्ही पाठपुरावा सोडणार नाही. राजकीय नेत्यांनी आश्वासने देऊ नयेत आणि शासकीय अधिकाऱ्यांनी कागदी घोडे पळवू नयेत असा इशारा दिला आहे.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!