मळेवाड-कोंडूरे येथील विलगीकरण कक्षाचा झाला शुभारंभ
*सावंतवाडी दि.३०-:* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे च्या विलगीकरण कक्षाचा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.गावागावात संख्या वाढत असल्याने सरकारने होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्व जिल्हा प्रशासनाला आदेश दिले की ज्या ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे त्या त्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना गाव पातळीवर कोरोना बाधित असणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी गाव विलगीकरण कक्ष सुरु करा असे आदेश देण्यात आले.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे येथील राणी पार्वतीदेवी विद्यालय केंद्र शाळा मळेवाड नंबर एक मध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यात आला. या कक्षाचा शुभारंभ सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते फीत कापून व डॉ आर ची कामत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या कक्षाच्या शुभारंभप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत असताना तहसीलदार म्हात्रे यांनी ग्रामपंचायत ने उभारलेला हा कक्ष इतर ग्रामपंचायत साठी आदर्शवत असा कक्ष असून सर्व सोयींनी युक्त असा हा कक्ष असल्याचे सांगितले. यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त करत असताना गावागावात असे कक्ष झाल्यास कोरोना तात्काळ थांबेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मान्यवर व्यक्तींनी विलगीकरण कक्षची पाहणी करून समाधान व्यक्त केले.यावेळी सरपंच हेमंत मराठे यांनी विलगीकरण कक्षातील रुग्णांना कोणकोणत्या सेवा देणार याबद्दल माहिती दिली. विलगीकरण कशात असणाऱ्या रुग्णांना सकाळी चहा नाश्ता, दुपारी चहा, रात्री दूध व सुका मेवा देण्यात येणार आहे. तसेच रोज अंडे आठवड्यातून एकदा मांसाहारी जेवण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णांना योगा व कौन्सिलिंग करण्यासाठी डॉ.पुराणिक हे सहकार्य करणार आहेत. रुग्णांचे मनोरंजन व्हावे यासाठी टेलिव्हिजन ची सुविधा या कक्षात देण्यात आली असून वाचनासाठी मॅगझीन व दैनिक देण्यात येणार आहेत एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची लेव्हल कमी झाल्यास त्याला इतरत्र हलवण्यासाठी युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे ची ऑक्सीजन सिलेंडर असलेली रुग्णवाहिका 24 तास सज्ज ठेवण्यात आली आहे.या विलगीकरण कक्षासाठी लागणारे बेड हे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले असून या कक्षासाठी लागणारे आरोग्य विषयक साहित्य लुपिन फाउंडेशन सिंधुदूर्ग ने आहे. हा कक्ष उभारण्यासाठी गावातील ग्रामस्थ, मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी कर्मचारी, तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोठे योगदान दिले आहे. सर्व सोयींनी युक्त असा तालुक्यातील आदर्शवत विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे.
या कक्षाच्या शुभारंभप्रसंगी प्रसंगी सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, लुपिन फाउंडेशन चे जिल्हा व्यवस्थापक योगेश प्रभू, डॉ आर व्ही कामत, डॉ विद्याधर सावंत,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अदिती ठाकूर, डॉ पावसकर, ग्रामविस्तार अधिकारी अनंत गावकर, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,तलाठी कृषी सहाय्यक अंकिता गवंडे, मुख्याध्यापिका मंजुषा मांजरेकर, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य,आशा स्वयंसेविका उपस्थित होते.