आणखीकणकवलीकोकणक्राइमसिंधुदुर्ग

सुमारे ​२० एच.पी. पंप अखेर महसूल व ग्रामपंचायतच्या संयुक्त कारवाईत जप्त…

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴 कणकवली : दि. ०६ गेले कित्येक दिवस जानवली नदीवर साकेडी हद्दीत अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्या अजित साटम यांच्या रबर बागेतील तो सुमारे ​२० एच.पी.चा पंप अखेर महसूल व ग्रामपंचायतच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला.

गेले काही दिवस या पंपाद्वारे कोणतीही परवानगी न घेता पाणी उपसा करण्यात येत होता. त्यामुळे या नदीलगत साकेडी मधील नळ योजना पाण्याच्या उद्भवाअभावी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या नळयोजनांवरून गावातील चार वाड्यांना पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात दरवर्षी ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने, या अनधिकृत पाणी उपशा बाबत साकेडी सरपंच रीना राणे यांनी काही महिन्यांपूर्वी कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले होते. त्यानंतर पवार यांच्या सूचनेनुसार हुबरट तलाठी योजना सापळे यांनी सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील यांच्यासह घटनास्थळी भेट देत पाहणी करत नदीतून थेट पाणी उपसा होत असल्याबाबत पंचनामा केला होता. व त्या बाबतचा अहवाल नांदगाव मंडळ अधिकारी यांना देण्यात आला होता. त्यानुसार मंडळ अधिकारी व्ही. ए. जाधव यांनी घटनास्थळी भेट देत नदीमध्ये पंप असतानाच स्पॉट पंचनामा केला होता. तसेच थेट नदी मध्ये पंप टाकून पाणी उपसा करण्यासाठी ग्रामसभेची व तहसीलदार कार्यालयाकडून कोणतीच परवानगी घेतली नसल्याचे या पाहणी दरम्यान स्पष्ट झाले होते.

त्यामुळे मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार सदर पंपाचे विद्युत कनेक्शन कट करण्याबाबत महावितरण च्या कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार महावितरणचे उप अभियंता संतोष नलावडे यांच्या सूचनेनुसार विद्युत कनेक्शन कट करण्यात आले होते. मात्र सदर मीटर कनेक्शन कट केल्यानंतर काही दिवसात पुन्हा विहिरीवर पंप लावण्यासाठी दीड एचपी चे कनेक्शन महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांकडून संबंधितांच्या मागणी नुसार देण्यात आले होते. पण संबंधितांकडून विहिरीवर पंप न बसवता पुन्हा थेट नदी मध्येच पंप टाकून पाणी उपसा सुरूच होता.

अनधिकृत पाणी उपसा प्रश्नी सदर पंप जप्त करण्याचे मंडळ अधिकाऱ्यांना तहसीलदारांचे आदेश असल्याने मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामपंचायत पदाधिकाऱयांनी पुन्हा वस्तुस्थितीची पाहणी करण्याकरीता भेट दिली असता थेट नदी मध्येच पंप सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे याबात सरपंच रीना राणे व उपसरपंच मोहम्मद जहूर शेख यांनी तहसीलदार यांचे लक्ष वेधले होते.

त्यानुसार तहसीलदार आर. जे. पवार यांनी या अनधिकृत पाणी उपशाची गांभीर्याने दखल घेत तातडीने मंडळ अधिकाऱ्यांना पंप जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी सकाळी मंडळ अधिकारी व्ही ए जाधव, तलाठी योजना सापळे, सरपंच रीना राणे, उपसरपंच महम्मद जहुर शेख, पोलीस पाटील कासम शेख, कोतवाल प्रदीप जाधव आदींच्या पथकाने घटनास्थळी जात पंचनामा करून सुमारे ​२० एचपी चा हा पंप जप्त केला. सदर चा पंप मंडळ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटील यांच्या ताब्यात देत तो ग्रामपंचायत मध्ये जमा करण्यात आला. अनधिकृत पाणी उपशा च्या विरोधात पंप जप्तीची तालुक्यातील ही या वर्षातील बहुदा पहिलीच कारवाई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!